पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज, परंतु मॅच फिक्सिंमुळे आजीवन बंदीची शिक्षा झालेल्या सलीम मलिकनं रविवारी पाकिस्तन क्रिकेट मंडळ ( पीसीबी) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे ( आयसीसी) माफी मागितली आहे. आयसीसी आणि पीसीबीला सर्व प्रकारचे सहकार्य करण्याची तयारी त्यानं दर्शवली आहे. 2000 साली मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली त्याच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली होती. 2008मध्ये न्यायालयानं ही बंदी उठवली, परंतु पीसीबीनं त्याला पुनरागमनाची संधी दिली नाही. रविवारी सलिम मलिकनं सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करून दुसऱ्या संधीची मागणी केली आहे.
मलिक म्हणाला,'' मानवाधिकारानुसार मला दुसरी संधी मिळायला हवी. क्रिकेट व्यतिरिक्त मला काही येत नाही आणि माझ्या उपजिविकेचं ते एकमेव साधन आहे. जर दुसऱ्या खेळाडूंना संधी मिळू शकते, तर मलाही मिळायला हवी.'' पीसीबीचे कायदा सल्लागार तफज्जुल रिझवी यांनी मलिक यांच्या सहकार्य करण्याच्या भूमिकेचं स्वागत केले.
मलिक यांच्यासह पाकिस्तानचा माजी गोलंदाज अताऊर रहमान याच्यावरही आजीवन बंदी घातली गेली होती. त्याशिवाय सहा खेळाडूंना दंड सुनावला होता. मलिकने 1982 ते 1999 या कालावधीत पाकिस्तानकडून 103 कसोटी आणि 283 वन डे सामने खेळले. त्यानं कसोटीत 15 शतकांसह 5768 धावा आणि वन डेत 5 शतकांसह 7170 धावा केल्या आहेत.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट म्हणजे युद्ध नव्हे; भारत-पाकिस्तान मालिकेसाठी आणखी एक पाक खेळाडू आग्रही
पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल Shoaib Akhtarचं मोठं विधान; म्हणाला...
KL Rahulला कथित Ex-Girlfriendनं केलं अनफॉलो? जाणून घ्या सत्य