बुधवारी वन डे विश्वचषकात ग्लेन मॅक्सवेल नावाचे वादळ आले अन् गोलंदाजांची पळता भुई थोडी झाली. नेदरलॅंड्सविरूद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने मोठा विजय मिळवून उपांत्य फेरीच्या शर्यतीतील आपले स्थान अधिक बळकट केले. मॅक्सवेलच्या अप्रतिम खेळीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला देखील या खेळीने भुरळ घातली. मॅक्सवेलने केवळ ४० चेंडूत शतक झळकावून इतिहास रचला. यामध्ये ८ षटकार आणि ९ चौकारांचा समावेश होता.
शाहिद आफ्रिदीने ऑस्ट्रेलिया आणि नेदरलॅंड्स यांच्यातील सामन्यानंतर ग्लेन मॅक्सवेलचे कौतुक केले. तसेच मॅक्सवेलने केलेली खेळी पाकिस्तानच्या फिनिशरने देखील करायला हवी, असे आफ्रिदीने यावेळी नमूद केले. सोशल मीडियावर एक पोस्ट करत आफ्रिदीने म्हटले, "ग्लेन मॅक्सवेलने अप्रतिम खेळी केली, ऑस्ट्रेलिया या विजयासाठी पात्र होतीच. पण मला वाटते की, इफ्तिखार अहमदने आमच्या संघासाठी अशी भूमिका पार पाडायला हवी. त्याच्यात नक्कीच ही क्षमता आहे. आता आपल्याला अधिक सक्रिय होऊन खेळण्याची गरज आहे."
पाकिस्तानी संघाचा फिनिशर म्हणून ओळख असलेल्या इफ्तिखार अहमदची बॅट चालू विश्वचषकात अद्याप शांत आहे. या स्पर्धेतील पाच सामन्यांमध्ये त्याला केवळ १०१ धावा करता आल्या आहेत. पाकिस्तानच्या शेवटच्या सामन्यात त्याने अफगाणिस्तानविरूद्ध ४० धावांची छोटी पण स्फोटक खेळी केली होती. पण, पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी कमाल केली आणि ऐतिहासिक विजय मिळवला. खरं तर वन डे विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच पाकिस्तानचा अफगाणिस्तानकडून पराभव झाला.
ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय
डेव्हिड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने नेदरलॅंड्सविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळवला. कांगारूंनी प्रथम फलंदाजी करताना ३९९ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात नवखा नेदरलॅंड्सचा संघ अवघ्या ९० धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाने हा सामना तब्बल ३०९ धावांनी आपल्या नावावर करून इतिहास रचला. लक्षणीय बाब म्हणजे विश्वचषकाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा विजय आहे.
Web Title: former pakistan cricketer Shahid Afridi wants Iftikhar Ahmed to play the role Glenn Maxwell plays for Australia and focus on power-hitting only in icc odi world cup 2023
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.