भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारल्याने पाकिस्तानींच्या पोटात दुखायला लागले आहे. स्पर्धा सुरू झाल्यापासून पाकिस्तानचे माजी खेळाडू टीम इंडियावर चिटींगचा आरोप करत आले आहेत.. कधी भारतीय गोलंदाजांसाठी वेगळा चेंडू वापरला जात असल्याचा आरोप त्यांनी केला, तर कधी DRS मध्ये चिटींग केल्याचे त्यांनी म्हटले... आज तर हद्दच झाली, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma Toss) टॉसमध्येच चिटींग करत असल्याचा आरोप पाकिस्तानचा माजी खेळाडू सिकंदर बख्त (Sikander Bakht ) याने केला आहे.
बख्तच्या या वादग्रस्त विधानाने नव्या वादाला तोंड फुटले आहे. आपल्या स्पष्ट विचारांसाठी ओळखल्या जाणाऱ्या बख्तने जिओ न्यूजवर टॉस हे षड्यंत्र असल्याचा दावा केला. बख्तच्या म्हणण्यानुसार, रोहित नाणं बऱ्याच लांब अंतरावर फेकतो, जेणेकरून प्रतिस्पर्धी कर्णधाराला तो पाहता येत नाही. त्यामुळे निकाल भारताच्या बाजूने दिला जातो. क्रिकेटमध्ये नाणेफेकीचे महत्त्व लक्षात घेता टीम इंडियाला फायदा होईल असाच निर्णय घेतला जातो. " नाणेफेकीच्या वेळी, रोहित शर्मा खूप दूर नाणे फेकतो, जेणेकरून प्रतिस्पर्धी संघ तिथे जाऊन खरंच टॉसचा निकाल काय लागला आहे हे पाहू शकत नाही," असा दावा बख्तने केला.