भारतातील कोरोना व्हायरसची दुसरी लाट आली आहे आणि त्यामुळे दररोज रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य विभागाची व्यवस्थाही तुटपुंजी पडत आहे. ऑक्सिजन सिलेंडरच्या तुडवड्यानं लोकांचा तडफडून मृत्यू होत असल्याच्या बातम्या रोज समोर येत आहेत. अशा भयानक परिस्थितीत लोकांना वाचवायचे तरी कसे, हा प्रश्न सर्वच सरकारला पडला आहे. भारताच्या मदतीसाठी अनेक शेजारील राष्ट्रही पुढे येत आहेत. त्यात पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर ( Shoaib Akhtar) यानंही भारतीयांना धीर दिला आहे.
शोएब अख्तरनं ट्विट केलं की,''भारतातील नागरिकांसाठी मी प्रार्थना करतो. परिस्थितीत लवकर सुधारणा होईल, अशी मी अपेक्षा करतो आणि भारत सरकार या संकटाशी मुकाबला करेल. या कठीण काळात आपण सर्व एकत्र आहोत.''
याआधी, भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये जानेवारी महिन्यात लागलेल्या आगीत चिमुकल्या बाळांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता आणि देशभरातून या घटनेबाबत शोक व्यक्त करण्यात येत आहे. शोएब अख्तर यानेही भंडाऱ्यातील आगीच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली होती. शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत 10 बाळांचा मृत्यू झाल्याची घटना खूपच धक्कादायक आणि दु:खद आहे, असं ट्विट शोएब अख्तरने केलं होतं.