वन डे विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डात वाद रंगला. बाबर आझमच्या संघाला उपांत्य फेरी गाठता न आल्याने शेजारील देशातील माजी खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आणि बाबरची हकालपट्टी करण्याची मागणी केली. बरेच दिवस वाद सुरू राहिला मग अखेर बाबर आझमने पीसीबीचे अध्यक्ष झका अश्रफ यांची भेट घेतल्यानंतर कर्णधारपदाचा राजीनामा दिला. अशातच संघाचा माजी खेळाडू आणि पाकिस्तानातील पंजाब राज्याचा क्रीडा मंत्री वहाब रियाजवर पीसीबीने एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. वहाब रियाजला नवीन सिलेक्टर म्हणून पदभार सोपवण्यात आला आहे.
पाकिस्तानी संघ आगामी काळात ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. १४ डिसेंबर ते ७ जानेवारी या कालावधीत शेजाऱ्यांचा संघ ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर तीन सामन्यांची मालिका खेळेल. या मालिकेसाठी संघ निवडण्याची जबाबदारी वहाब रियाजवर असणार आहे. तसेच १२ ते २१ जानेवारी दरम्यान पाकिस्तान न्यूझीलंडसोबत पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे.
दरम्यान, वहाब रियाजने २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने २७ कसोटी, ९१ वन डे आणि ३६ ट्वेंटी-२० सामन्यांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. अखेरच्या षटकांमध्ये 'विकेट टेकर' गोलंदाज म्हणून रियाजला ओळखले जायचे. त्याने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण २३७ बळी घेतले असून १२०० धावा केल्या आहेत. विश्वचषकाच्या इतिहासात सर्वात यशस्वी पाकिस्तानी गोलंदाजांमध्ये त्याचा दुसरा क्रमांक लागतो.