जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसनं क्रिकेट विश्वालाही हादरे दिले आहेत. पाकिस्तानचे माजी प्रथम क्षेणी क्रिकेटपटू जाफर सर्फराज यांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला. पेशावर येथील खाजगी रुग्णालयात 50 वर्षीय सर्फराज मागील तीन दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होते. कोरोनामुळे निधन झालेले सर्फराज हे पाकिस्तानातील पहिले प्रोफेशनल क्रिकेटपटू आहेत.
सर्फराज यांनी 1988मध्ये क्रिकेट कारकीर्दिला सुरुवात केली आणि त्यांनी पेशावरसाठी 15 प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 616 धावा केल्या. शिवाय त्यांनी सहा वन डे सामन्यांत 96 धावा केल्या. 1994 मध्ये त्यांनी निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर त्यांनी पेशावरच्या 19 वर्षांखालील संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली.
पाकिस्तानचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू अख्तर सर्फराज यांचे हे भाऊ होते. अख्तर यांचेही 10 महिन्यापूर्वी कर्करोगामुळे निधन झाले होते. पाकिस्तानात आतापर्यंत 5500 कोरोना रुग्ण आढळले आहेत आणि त्यापैकी 744 रुग्ण हे पेशावर शहरातील खीबेर पखतुख्वा भागातील आहेत.