नवी दिल्ली : पाकिस्तानच्या संघाला आशिया चषकात (Asia Cup 2022) पराभवाने सुरूवात करावी लागली. भारताविरूद्ध झालेल्या चुरशीच्या लढतीत हार्दिक पांड्याने षटकार ठोकून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने भारतासमोर 148 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे भारतीय संघाने 5 बळी आणि 2 चेंडू राखून पूर्ण केले. यानंतर शोएब अख्तर आणि वसीम अक्रम यांनी बाबर आझम-मोहम्मद रिझवान (Babar Azam And Mohammad Rizwan) यांच्यावर जोरदार टीका केली होती. आता पाकिस्तानचे माजी मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी अख्तर आणि अक्रम यांच्या सुरात सूर मिसळला आहे.
पाकिस्तानचे माजी मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी ईएसपीएनक्रिकइन्फोमध्ये म्हटले, "मला वाटते की पाकिस्तानच्या संघाने बाबर आणि रिझवानला वेगळे करावे. तर फखरने सलामीवीराची जबाबदारी स्वीकारावी. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना भारताविरुद्ध मोठी खेळी करता आली नाही", एकूणच बाबर आझमने मधल्या फळीत फलंदाजी करायला हवी असे पाकिस्तानच्या माजी खेळाडूंचे मत आहे.
नियोजनानुसार संघ निवडण्याची गरज "मी जेव्हा पाकिस्तानच्या संघासोबत खेळत होतो, तेव्हा संघात सर्वकाही नियोजनानुसार व्हायचे. त्यामुळे आम्ही टी-20 क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत होतो, आम्ही फलंदाजांच्या क्षमतेनुसार त्यांचा क्रम ठरवायचो. आम्ही सर्वोत्तम संघ तयार करायचो आणि ती आमच्यासाठी चांगली गोष्ट होती", असे मिकी आर्थर यांनी आणखी सांगितले.
बाबर-रिझवानची जोडी ठरली अयशस्वी बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान हे भारताविरुद्ध वाईटरित्या फ्लॉप ठरले होते. बाबर आझम तर केवळ 10 धावा करून डावाच्या तिसऱ्या षटकात तंबूत परतला. त्याचवेळी रिझवानने 42 चेंडूत 43 धावांची संयमी खेळी केली. रिझवानने डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला, मात्र शॉट पिच चेंडूवर हार्दिक पांड्याने त्याची शिकार केली. पाकिस्तानकडे मधल्या फळीत एकही अनुभवी फलंदाज नाही. याच कारणामुळे त्यांना भारताविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे आगामी सामन्यात पाकिस्तानच्या क्रमवारीत बदल होण्याची दाट शक्यता आहे.