वन डे विश्वचषक २०२३ मधील पाकिस्तानचा प्रवास संपला असून शेजाऱ्यांना उपांत्य फेरीत स्थान मिळवता आले नाही. पाकिस्तानी संघ आठ गुणांसह पाचव्या स्थानावर राहिला. उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर झाल्यानंतर बाबर आझमचा संघ मायदेशी परतला आहे. खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डात वाद रंगला आहे. कर्णधार बाबर आझमसह सर्व पाकिस्तानी संघ माजी खेळाडूंच्या निशाण्यावर आहे. आपल्या संघाच्या कामगिरीबद्दल बोलताना एका शोमध्ये पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रज्जाकने एक लाजिरवाणे विधान केले. बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायचा दाखला देत त्याने आपल्या संघाला घरचा आहेर दिला. या कार्यक्रमात शाहिद आफ्रिदी, मिस्बाह-उल-हक आणि उमर गुल यांसारखे माजी खेळाडू देखील उपस्थित होते.
रज्जाकने ऐश्वर्या राय बच्चनबद्दल टिप्पणी करताच चाहत्यांनी पाकिस्तानी खेळाडूला त्याची जागा दाखवली. तो सोशल मीडियावर चाहत्यांच्या रोषाचा सामना करत आहे. रज्जाकने ऐश्वर्याबद्दल विधान करताच इतर माजी क्रिकेटपटूही रझाकच्या कमेंटवर हसताना दिसले.
अब्दुल रज्जाकने म्हटले, "चांगली कामगिरी करण्यासाठी संघाचा हेतू योग्य असला पाहिजे. जर मी ऐश्वर्या राय बच्चनशी लग्न केले आणि चांगली मुले व्हावीत असा विचार केला तर तसे होणार नाही. तुम्हाला तुमचा हेतू आधी बरोबर सेट करावा लागेल." रज्जाक पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या हेतूवर प्रश्न उपस्थित करत होता. रज्जाकचे हे लाजिरवाणे विधान सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून चाहते त्याला लक्ष्य करत आहेत.
दरम्यान, वन डे विश्वचषक २०२३ पाकिस्तानी संघासाठी एका वाईट स्वप्नाप्रमाणे राहिला. बाबर आझमच्या नेतृत्वातील संघाला नऊपैकी केवळ चार सामने जिंकता आले. तर उर्वरित पाच सामन्यांत पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तान २०२३ च्या विश्वचषकापूर्वी उपांत्य फेरी गाठण्याचा प्रबळ दावेदार मानला जात होता, परंतु बाबर आझम अँड कंपनीने विश्वचषकात ज्याप्रकारे कामगिरी केली, त्यामुळे पाकिस्तानचे क्रिकेट चाहते खूपच निराश झाले आहेत. पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनीही बाबर आझमच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले आहेत.