Abdul Razzaq On Aishwarya Rai : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायबद्दलच्या लाजिरवाण्या विधानामुळे पाकिस्तानचा माजी खेळाडू अब्दुल रज्जाक चर्चेत आला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा हेतू सांगताना रज्जाकने ऐश्वर्याचे नाव घेत एक अजब टिप्पणी केली होती. यावरून त्याला चांगलेच ट्रोल करण्यात आले. शाहिद आफ्रिदी, शोएब अख्तरसह अनेक माजी खेळाडूंनी रज्जाकच्या विधानाचा निषेध केला. आता खुद्द रज्जाकने देखील आपल्या चुकीची कबुली देत माफी मागितली असून चूक मान्य केली आहे.
नेहमी प्रसिद्धीच्या शोधात असलेला रज्जाक सातत्याने वादग्रस्त विधाने करून चर्चेत येण्याचा प्रयत्न करत असतो. भारतीय खेळाडूंवर खालच्या पातळीवर टीका करून रज्जाक चाहत्यांचे लक्ष वेधतो. अशातच एका कार्यक्रमात बोलताना माजी पाकिस्तानी खेळाडूने ऐश्वर्याबद्दल वादग्रस्त टिप्पणी केली. अब्दुल रज्जाकने म्हटले होते, "चांगली कामगिरी करण्यासाठी संघाचा हेतू योग्य असला पाहिजे. जर मी ऐश्वर्या राय बच्चनशी लग्न केले आणि चांगली मुले व्हावीत असा विचार केला तर तसे होणार नाही. तुम्हाला तुमचा हेतू आधी बरोबर सेट करावा लागेल." रज्जाक पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या हेतूवर प्रश्न उपस्थित करत होता.
अब्दुल रज्जाकचा माफीनामा अब्दुल रज्जाकने वाद चिघळल्यानंतर एक व्हिडीओ शेअर करत माफी मागितली. त्याने सांगितले की, कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. आम्ही क्रिकेट कोचिंग आणि व्यवस्थापनाबद्दल बोलत होतो. तेव्हा माझी जीभ घसरली आणि मी चुकून ऐश्वर्या रायचे नाव घेतले. मी व्यक्तिगतपणे तिची माफी मागू इच्छितो.
दरम्यान, वन डे विश्वचषक २०२३ पाकिस्तानी संघासाठी एका वाईट स्वप्नाप्रमाणे राहिला. बाबर आझमच्या नेतृत्वातील संघाला नऊपैकी केवळ चार सामने जिंकता आले. तर उर्वरित पाच सामन्यांत पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तान २०२३ च्या विश्वचषकापूर्वी उपांत्य फेरी गाठण्याचा प्रबळ दावेदार मानला जात होता, परंतु बाबर आझम अँड कंपनीने विश्वचषकात ज्याप्रकारे कामगिरी केली, त्यामुळे पाकिस्तानचे क्रिकेट चाहते खूपच निराश झाले आहेत. पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनीही बाबर आझमच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले आहेत.