ind vs pak 2023 : भारत आणि पाकिस्तान यांच्यात मागील मोठ्या कालावधीपासून एकही द्विपक्षीय मालिका झाली नाही. दोन्ही देशांमध्ये असलेले तणावपूर्ण संबंध क्रिकेटमध्ये दुरावा निर्माण करत आहेत. खरं तर २०१२-१३ मध्ये शेवटच्या वेळी या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये द्विपक्षीय मालिका झाली होती. तेव्हा पाकिस्तानी संघ भारत दौऱ्यावर आला होता. आता पाकिस्तानी संघाचा माजी खेळाडू अब्दुल रझाकने दोन्ही देशात द्विपक्षीय मालिका होत नसल्यावरून एक अजब विधान केले आहे.
"आम्ही सर्व संघांचा आदर करतो. पण पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार देणारा भारत हा एकमेव संघ आहे. १९९७-९८ ही वर्षे वगळता भारत आमच्याविरुद्ध फारसा खेळला नाही कारण त्यांना पराभवाची भीती होती. पाकिस्तानचा संघ खूप चांगला होता आणि भारत अनेकदा आमच्याविरुद्ध हरला आहे", असे अब्दुल रझाकने सांगितले. तो ईएचक्रिकेटशी बोलत होता.
पाकिस्तानचा संघ कमकुवत आहे असे नाही - रझाक तसेच २००३ पासून परिस्थितीमध्ये बदल झाला आहे. पण आपण अजूनही तिथेच अडकलो आहोत. आपली विचारसरणी बदलायला हवी. कारण आता दोन्हीही संघ मजबूत आहेत, पाकिस्तानचा संघ कमकुवत आहे असे म्हणता येणार नाही. तुम्ही अॅशेस मालिका पाहा, कोणता संघ अधिक मजबूत आहे ते सांगता येईल का? जो संघ चांगली कामगिरी करेल तो जिंकेल हे सरळ गणित आहे, असेही त्याने म्हटले.
१५ ऑक्टोबरला थरारआगामी वन डे विश्वचषक भारतात होणार असून स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ५ ऑक्टोबरपासून या बहुचर्चित स्पर्धेला प्रारंभ होणार आहे, तर १५ ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमनेसामने असतील. सलामीचा सामना न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे.