पाकिस्तानी संघ ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर कसोटी मालिका खेळत आहे. मागील २८ वर्षात एकदाही शेजाऱ्यांना ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. नवनिर्वाचित कर्णधार शान मसूदच्या नेतृत्वातील संघ हा लाजिरवाणा विक्रम मोडेल अशी आशा पाकिस्तानी चाहत्यांना होती. पण, यजमान कांगारूंनी सलामीचे दोन सामने जिंकून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. २८ वर्षांची परंपरा कायम ठेवत ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ७९ धावांनी पराभव केला. या मालिकेतील ऑस्ट्रेलियाचा हा सलग दुसरा विजय आहे. पाकिस्तानी संघ संघर्ष करत असताना पाकिस्तानचा दिग्गज वसिम अक्रमने एक मोठे विधान केले.
स्पोर्ट्सकीडावरील 'This or That' प्रश्नमंजुषादरम्यान वसिम अक्रमने पाकिस्तानऐवजी ऑस्ट्रेलियाचा मुख्य प्रशिक्षक होण्याबाबत चर्चा केली. कोणत्या संघाचा प्रशिक्षक व्हायला आवडेल यावर बोलताना अक्रमने म्हटले, "जर तुम्ही मला हा पर्याय देत असाल तर मी ऑस्ट्रेलियाची निवड करेन. माझ्या बायकोमुळे नाही, पण ऑस्ट्रेलियाच्या संघाला मार्गदर्शन करताना दबाव कमी असेल आणि मी चांगल्या पद्धतीने माझं काम करू शकेन."
वसिम अक्रमची 'मन की बात'यादरम्यान, वसिम अक्रमला आयपीएल आणि पाकिस्तान सुपर लीगबद्दल देखील प्रश्न विचारण्यात आले. आयपीएल जगातील सर्वात लोकप्रिय लीग आहे, तर पाकिस्तान सुपर लीगचीही खूप चर्चा असते. पाकिस्तानी चाहते पीएसएलची तुलना नेहमी आयपीएलशी करत असतात. यावर बोलताना अक्रमने पाकिस्तान सुपर लीगला मिनी आयपीएल असे संबोधले.
तसेच मी आयपीएल आणि पाकिस्तान सुपर लीग या दोन्ही स्पर्धांमध्ये काम केले आहे. त्यामुळे मला वाटते की, यांची तुलना केली जाऊ शकत नाही. आयपीएल एक मोठी स्पर्धा आहे. पीएसएल पाकिस्तानात खूप मोठी आहे. आमच्या देशात पाकिस्तान सुपर लीगकडे मिनी आयपीएल म्हणून पाहिले जाते, असेही अक्रमने सांगितले.