Join us  

"मोदी, शाह यांचे आभार, पाकिस्तानातील हिंदू आता मोकळा श्वास घेतील", क्रिकेटपटूचे विधान

भारत सरकारने ऐतिहासिक निर्णय घेत देशात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 4:12 PM

Open in App

भारत सरकारने ऐतिहासिक निर्णय घेत देशात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केला आहे. सोमवारी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील सरकारने सीएएबद्दल मोठा निर्णय घेतला. केंद्रीय गृह मंत्रालयाने CAA बाबत अधिसूचना जारी केली. २०१९ मध्ये संसदेत मंजूर झालेला हा कायदा आता लागू करण्यात आला आहे. याबाबत जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत. अशातच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून सीएएवरून नरेंद्र मोदी आाणि अमित शाह यांचे आभार मानले. 

भारतात आगामी काळात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्याआधीच देशात नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला हिरवा कंदील मिळाला आहे. गृह मंत्रालयाने सीएए कायद्याच्या अंमलबजावणीची घोषणा करून एक मोठी घोषणा केली. CAA लागू झाल्यानंतर अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशातील हिंदू, शीख, जैन, बौद्ध, ख्रिश्चन आणि पारशी या समाजातील लोकांना भारतीय नागरिकत्व मिळणे सोपे होणार आहे. याचाच दाखला देत माजी पाकिस्तानी क्रिकेटर दानिश कनेरियाने CAA लागू केल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

दानिश कनेरिया नेहमी पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर, तेथील खेळाडूंवर आरोप करत असतो. कनेरियाने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत पाकिस्तानकडून खेळताना त्याने ६१ कसोटी सामन्यात २६१ बळी घेतले. तसेच १८ वन डे सामन्यांमध्ये त्याला १५ बळी घेता आले. ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये कनेरियाने ६५ सामन्यांमध्ये ८७ बळी पटकावले. 

भारत सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केल्यानंतर कनेरियाने पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. ४३ वर्षीय कनेरियाने पोस्टमध्ये लिहिले की, आता पाकिस्तानी हिंदू मोकळ्या हवेत श्वास घेऊ शकतील. तसेच आणखी एक पोस्ट करत त्याने पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचे आभार मानले. 

टॅग्स :पाकिस्ताननागरिकत्व सुधारणा विधेयकनरेंद्र मोदीअमित शाहऑफ द फिल्ड