BCCI vs PCB, Moin Khan । नवी दिल्ली : आशिया चषकाच्या यजमानपदावरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) यांच्यात वाद सुरू आहे. आयसीसीच्या नियोजित वेळापत्रकानुसार आशिया चषक 2023 ची स्पर्धा पाकिस्तानात होणार आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नसल्याचे बीसीसीआय सचिव जय शाह यांनी आधीच स्पष्ट केले आहे. यावर पीसीबीचे तत्कालीन अध्यक्ष रमीझ राजा यांनी भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती. पाकिस्तानचे माजी खेळाडू वारंवार बीसीसीआयला लक्ष्य करत टीकास्त्र सोडत असतात. अशातच आता पाकिस्तानचा माजी खेळाडू मोईन खानने बीसीसीआयवर टीका केली आहे.
मोईन खानने पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तान क्रिकेटमधील घडामोडींवर भाष्य केले. आशिया चषकाबद्दल बोलताना मोईनने म्हटले, "जर भारतीय संघ आशिया चषकासाठी पाकिस्तानात आला नाही तर पाकिस्तानने देखील वन डे विश्वचषकासाठी भारतात जाऊ नये. मला वाटते की पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याविरोधात असायला हवे." तसेच भारताने आशिया चषक एखाद्या तटस्थ ठिकाणी खेळला तर पाकिस्तानचे देखील सामने तटस्थ ठिकाणी खेळवावे असे मोईन खानने म्हटले.
"पैशांची उधळपट्टी करून भारत आपली इच्छा इतर क्रिकेट बोर्डांवर लादू शकत नाही. क्रिकेट खेळले पाहिजे आणि त्यासाठी भारत आणि पाकिस्तानच्या बोर्डांमध्ये चर्चा व्हायला हवी. क्रिकेटच्या माध्यमातूनच दोन्ही देशात समन्वय साधला जाऊ शकतो", असे मोईन खानने अधिक म्हटले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"