arjun tendulkar first ipl wicket । मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (sachin tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरने मोठ्या कालावधीपर्यंत मुंबई इंडियन्सच्या (mumbai indians) संघासोबत राहिल्यानंतर अखेर रविवारी आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याने कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध (kkr) त्याचा पदार्पणाचा सामना खेळला. केकेआरविरूद्ध पदार्पणाच्या सामन्यात अर्जुनने २ षटके टाकली आणि १७ धावा दिल्या. आयपीएलमधील आपला दुसरा सामना ज्युनिअर तेंडुलकरने सनरायझर्स हैदराबादविरूद्ध खेळला. कर्णधार रोहित शर्माने पॉवरप्लेमध्ये अर्जुनला गोलंदाजी दिली होती.
दरम्यान, हैदराबादला अखेरच्या षटकात विजयासाठी २० धावांची गरज असताना रोहितने अर्जुन तेंडुलकरकडे चेंडू सोपवला. अर्जुनने सर्वांना प्रभावित करताना अखेरच्या षटकात केवळ ५ धावा देऊन एक बळी घेतला. अशातच पाकिस्तानचा माजी खेळाडू राशिद लतीफने अर्जुनवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
"अर्जुन तेंडुलकरची ही सुरूवात आहे" पाकिस्तानच्या माजी खेळाडूने त्याच्या युट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले, "अर्जुन तेंडुलकरची ही सुरूवात आहे. त्याला आणखी जास्त मेहनत करावी लागणार आहे. कोणत्या मोठ्या खेळाडूने त्याला चांगले मार्गदर्शन केले तर तो त्याच्या गोलंदाजीत वेग आणू शकेल. हा अतिशय हळवा विषय आहे. प्रशिक्षण करून खेळाडूंमध्ये बदल करणे हे खुद्द सचिनने केले होते. पण त्याने यासाठी देशांतर्गत क्रिकेटवर विश्वास ठेवला. तुमचा पाया मजबूत असायला हवा. अर्जुनचे संतुलन चांगले नाही आहे आणि त्याची गती देखील कमी आहे. तो १३५ किमी प्रति तास वेगाने गोलंदाजी करू शकतो. तो एक चांगला फलंदाजही असून २-३ वर्षात चांगला खेळाडू बनू शकतो."
पाकिस्तानी खेळाडूचं मोठं विधान पाकिस्तानचा माजी खेळाडू राशिद लतीफने सांगितले की, अर्जुन दुसर्या फ्रँचायझीसाठी खेळला असता तर त्याची वृत्ती वेगळी असती. "जर तो सनरायझर्स हैदराबादसारख्या दुसर्या फ्रँचायझीसाठी खेळला असता तर त्याच्यात बदल दिसला असता. मात्र यावेळी त्याचे वडीलही ड्रेसिंग रूममध्ये त्याच्यासोबत आहेत. त्याच्या वडिलांची भूमिका आता त्याच्या क्रिकेटशिवाय इतर आयुष्यातही असायला हवी", असे लतीफने अधिक सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"