ODI World Cup 2023 : पाच ऑक्टोबरपासून भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. वन डे विश्वचषकासाठी वेळापत्रक जाहीर झाले असून १५ ऑक्टोबर रोजी भारत विरूद्ध पाकिस्तान असा सामना होणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने असणार आहेत. आगामी विश्वचषक भारतात होत असल्यामुळे स्पर्धेचा प्रमुख दावेदार म्हणून यजमान संघाकडे पाहिले जात आहे. बीसीसीआयने अद्याप विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर केलेला नाही. अशातच पाकिस्तानच्या माजी खेळाडूने शिखर धवनला संधी देण्याचा सल्ला दिला आहे.
दरम्यान, आयसीसीच्या स्पर्धांमध्ये शिखर धवनची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. त्याने मागील चार आयसीसी वन डे स्पर्धांमधील २० सामन्यांमध्ये सहा शतके झळकावली आहेत. त्यामुळे धवनला संघात संधी मिळायला हवी, असे पाकिस्तानचा माजी खेळाडू सलमान बटने म्हटले आहे. पाकिस्तानचा माजी सलामीवीर सलमान बटने आगामी वन डे विश्वचषक २०२३ साठी अनुभवी सलामीवीर शिखर धवनला संधी मिळायला हवी असे मत मांडले. आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलनाता बट म्हणाला की, भारताला धवनसारख्या अनुभवी सलामीवीराची गरज आहे.
"भारतीय संघात टॉप ऑर्डरमध्ये एका अनुभवी फलंदाजाची गरज आहे. उजव्या हाताच्या फलंदाजांमध्ये मला एकही टॉप ऑर्डर बॅट्समन दिसत नाही, ज्याच्यात धवनसारखी क्षमता आहे. सलामीवीर म्हणून धवन इतरांच्या तुलनेत अधिक चांगली कामगिरी करू शकतो", असेही सलमान बटने म्हटले.
विश्वचषकातील भारताचे सामने -
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ८ ऑक्टोबर, चेन्नई
- भारत विरुद्ध अफगाणिस्तान,११ ऑक्टोबर, दिल्ली
- भारत विरुद्ध पाकिस्तान, १५ ऑक्टोबर, अहमदाबाद
- भारत विरुद्ध बांगलादेश, १९ ऑक्टोबर, पुणे
- भारत विरुद्ध न्यूझीलंड, २२ ऑक्टोबर, धर्मशाला
- भारत विरुद्ध इंग्लंड, २९ ऑक्टोबर, लखनौ
- भारत विरुद्ध क्वालिफायर, २ नोव्हेंबर, मुंबई
- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ५ नोव्हेंबर, कोलकाता
- भारत विरुद्ध क्वालिफायर, ११ नोव्हेंबर, बंगळुरू