Join us  

"आम्हाला धमक्या मिळाल्या तरी आम्ही भारतात आलो, पण आता...", आफ्रिदीची BCCI वर टीका

शाहिद आफ्रिदीची बीसीसीआयवर टीका.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 9:02 PM

Open in App

Shahid Afridi On BCCI : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार पाकिस्तानच्या धरतीवर होणार आहे. पण, बीसीसीआय आपला संघ तिकडे पाठवणार नसल्याचे जवळपास निश्चित आहे. याआधी देखील भारताने आपला संघ पाकिस्तानात पाठवण्यास नकार दर्शवला आहे. याचाच दाखला देत पाकिस्तानचे माजी खेळाडू वारंवार बीसीसीआयवर टीका करत आहेत. अलीकडेच भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंगने शेजाऱ्यांवर टीका करताना आमचा संघ तिकडे येणार नसल्याचे स्पष्ट सांगितले. यावरून पाकिस्तानचा माजी खेळाडू तन्वीर अहमद चांगलाच संतापला. आता शाहिद आफ्रिदीने यात उडी घेत भाष्य केले आहे. 

शाहिद आफ्रिदी म्हणाला की, पाकिस्तानचा दौरा न करण्यामागे बीसीसीआय पुन्हा एकदा सुरक्षेचे कारण सांगणार आहे. आम्ही अनेक वेळा भारतात आलो आहोत. कठीण परिस्थितीतही न घाबरता भारताच्या धरतीवर पाऊल ठेवले. आम्हाला धमक्या येत असल्या तरी आम्ही भारताचा दौरा सुरूच ठेवतो. पण, यामुळे आता बीसीसीआयचा हेतू उघड झाला. आम्ही भारताला पाठिंबा दिला आहे. आम्हाला धमक्या येत राहिल्या, पण पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि सरकारने आम्हाला तिकडे जाण्यास सांगितले. जर भारतीय क्रिकेट बोर्डाला आपला संघ पाकिस्तानात पाठवायचा असेल तर ते पाठवतील. अन्यथा ते जर इथे येणार नसतील तर ते सुरक्षेचा बहाणा सांगतील. आफ्रिदी पाकिस्तानातील माध्यमांशी बोलत होता. 

दरम्यान, पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीवरून बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष होत असल्याचे दिसते. आयसीसीच्या नियोजित वेळापत्रकानुसार पाकिस्तानच्या धरतीवर चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा थरार रंगणार आहे. पण, बीसीसीआय आपल्या संघाला पाकिस्तानात पाठवणार नसल्याचे कळते. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी आयसीसीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. खरे तर भारताने सुरक्षेच्या कारणास्तव नेहमीच पाकिस्तानात जाणे टाळले आहे. शेवटच्या वेळी या दोन्ही देशांमध्ये २०१२-१३ मध्ये द्विपक्षीय मालिका झाली होती. तेव्हापासून केवळ आशिया चषक आणि आयसीसी स्पर्धांमध्ये हे कट्टर प्रतिस्पर्धी भिडतात. पाकिस्तानने २०१७ मध्ये भारताचा पराभव करून चॅम्पियन्स ट्रॉफीचा किताब जिंकला होता.

टॅग्स :शाहिद अफ्रिदीभारत विरुद्ध पाकिस्तानबीसीसीआय