नवी दिल्ली: पाकिस्तानी संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. खरं तर 'रावळपिंडी एक्सप्रेस' म्हणून सर्वदूर ख्याती असलेला अख्तर तिसऱ्यांदा बाबा झाला आहे. त्याच्या घरी एका चिमुकलीचं आगमन झालं आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं ही माहिती दिली. त्यानं कॅप्शनच्या माध्यमातून म्हटलं की, मिकाईल आणि मुजद्दीद यांना आता एक लहान बहीण मिळाली आहे. १ मार्च २०२४ रोजी जुम्माच्या नमाजच्या वेळी जन्मलेल्या नूरह अली अख्तरचं या जगात स्वागत आहे.
शोएब आणि त्याची पत्नी रुबाब खान यांना आधीच दोन मुलगे आहेत. मोहम्मद मिकाईल अली हा मोठा मुलगा आहे, त्याचा जन्म २०१६ मध्ये झाला. तर मुजद्दीद अली याचा तीन वर्षांनंतर जन्म झाला. शोएब अख्तरने रुबाब खानसोबत २०१४ मध्ये खैबर पख्तुनख्वामध्ये लग्न केले. शोएबचे लग्न झाले तेव्हा तो ३८ वर्षांचा होता तर त्याची पत्नी रुबाब २० वर्षांची होती.
शोएब अख्तर त्याच्या विधानांमुळे सतत चर्चेत असतो. मात्र, तो मागील काही कालावधीपासून सोशल मीडियापासून दूर होता. क्रिकेटच्या चालू घडामोडींवर भाष्य करणारा अख्तर नाना कारणांनी प्रसिद्धीच्या झोतात असतो. कधी भारतीय खेळाडूंवर टीका असो की मग पाकिस्तानी खेळाडूंना दिलेला घरचा आहेर असो... अख्तर त्याच्या विधानांनी अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.