IND vs PAK, ODI World Cup 2023 : नेहमीप्रमाणे भारतीय संघाने आपले वर्चस्व कायम राखताना पाकिस्तानचा दारूण पराभव केला. वन डे विश्वचषकात शनिवारी कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने होते. सामन्यापूर्वी अनेक जाणकार तसेच पाकिस्तानचे माजी खेळाडू रंगतदार सामन्याची अपेक्षा करत होते. पण, भारतीय कर्णधार रोहित शर्माने स्फोटक खेळी करून सगळ्यांची बोलती बंद केली. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने देखील टीम इंडियाच्या अप्रतिम खेळीचे कौतुक केले असून आपल्या संघाला घरचा आहेर दिला आहे. रोहित शर्माचा संघ २०११ ची पुनरावृत्ती करत असल्याचेही अख्तरने यावेळी नमूद केले.
अख्तरने रोहित शर्माच्या खेळीचे तोंडभरून कौतुक केले. शोएब अख्तर म्हणाला की, रोहित शर्मा मोठा खेळाडू आहे, त्याच्याकडे सर्व प्रकारचे शॉट्स आहेत. भारताविरूद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव झाला. भारताने लहान मुलांसारखी आमची धुलाई केली. मी हे पाहू शकलो नाही. रोहितने पाकिस्तानी गोलंदाजांची खिल्ली उडवून मागील दोन वर्षांचा सगळा बदला घेतला.
अख्तरकडून रोहितचे कौतुक "रोहितने ज्या पद्धतीने खेळी केली, त्यामुळे पाकिस्तानी गोलंदाजांचा दर्जा खाली गेला. रोहितने मागील दोन वर्ष न केलेल्या धावांचा बदला या सामन्यातून घेतला. रोहितचे पुनरागमन पाहून चांगले वाटले. भारत २०११ च्या विश्वचषकातील प्रवासावर पाऊल टाकत असल्याचे दिसत आहे. जर उपांत्य फेरीत काही गडबड झाली नाही तर नक्कीच भारत विश्वचषक उंचावेल", असेही अख्तरने सांगितले. भारताची विजयी हॅटट्रिक शेजाऱ्यांचा दारूण पराभव करून भारताने चालू विश्वचषकात विजयाची हॅटट्रिक लगावली. पाकिस्तानी संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना ४२.५ षटकांत सर्वबाद केवळ १९१ धावा केल्या. पाकिस्तानने दिलेल्या १९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने आक्रमक सुरूवात केली. विश्वचषकात पदार्पण करत असलेल्या शुबमन गिलने काही चांगले फटकार मारले पण त्याला शाहीन आफ्रिदीने जास्त वेळ टिकू दिले नाही. मग कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने ६ चौकार आणि ६ षटकार मारून ६३ चेंडूत ८६ धावांची खेळी केली. याशिवाय श्रेयस अय्यरने नाबाद ५३ धावा करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.