रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने वन डे विश्वचषकात चमकदार कामगिरी केली. साखळी फेरीतील सर्व नऊ सामने जिंकून यजमानांनी उपांत्य फेरी गाठली. इतिहासात प्रथमच भारतीय संघाला अपराजित राहून उपांत्य फेरीचे तिकिट मिळाले. उपांत्य सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करून २०१९ चा बदला घेण्यात रोहितसेनेला यश आलं. पण अंतिम सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाने मात्र तमाम भारतीयांच्या स्वप्नावर पाणी टाकले. यंदा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपेल अशी आशा असताना कांगारूंनी भारतीय चाहत्यांच्या स्वप्नाचा चुराडा केला. अपराजित संघ फायनलमध्ये पराभूत होतो यावर अद्याप काही चाहत्यांना विश्वास बसत नाही. पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरने देखील रोहित शर्माचे कौतुक करताना हेच संकेत दिले.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने स्वत:च्या वैयक्तिक विक्रमांचा विचार न करता संघासाठी स्फोटक सुरूवात करून दिली. अंतिम सामन्यातही त्याने ४७ धावांची महत्त्वाची खेळी केली पण कांगारूंनी टाकलेल्या जाळ्यातून तो स्वत:ला वाचवू शकला नाही. ग्लेन मॅक्सवेलच्या षटकात रोहितने एक षटकार आणि चौकार मारला. पण अखेरचा चेंडू देखील मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात असलेल्या रोहितचा ट्रॅव्हिस हेडने अप्रतिम झेल घेऊन भारताला मोठा धक्का दिला.
अख्तरकडून रोहितचे कौतुक हिटमॅन रोहित शर्माला विश्वचषक उंचावण्यात अपयश आले असले तरी सर्वच स्तरातून त्याचे कौतुक होत आहे. शोएब अख्तरने म्हटले, "रोहित शर्माने अप्रतिम खेळ केलाच याशिवाय योग्य पद्धतीने संघाचे नेतृत्वही केले. यंदाचा विश्वचषक जिंकण्यासाठी तो नक्कीच पात्र होता... तो किताब का जिंकू शकला नाही याचा मी अजूनही विचार करतो. तो त्याच्या वैयक्तिक विक्रमांची पर्वा न करता खेळतो म्हणून एक निस्वार्थी खेळाडू म्हणून त्याने ओळख निर्माण केली आहे." अख्तर एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलत होता.
यंदाच्या विश्वचषकातील बरेचसे सामने भारताने धावांचा पाठलाग करताना जिंकले. धावांचा बचाव करताना तर यजमान संघ अधिक मजबूत दिसला. अंतिम सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यजमान संघाला शुबमन गिलच्या (४) रूपात मोठा झटका बसला. त्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा (४७) आणि विराट कोहली (५४) यांनी डाव सावरला. पण ग्लेन मॅक्सवेलच्या षटकांत चुकीचा फटका मारून रोहित बाद झाला. ट्रॅव्हिस हेडने अप्रतिम झेल घेऊन हिटमॅनला बाहेरचा रस्ता दाखवला. दुसरीकडे विराट सावध खेळी करून भारताचा डाव पुढे नेत होता. अशातच ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने यजमानांना आणखी एक धक्का देत श्रेयस अय्यरला तंबूत पाठवले. मग विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी भारतीयांच्या आशा जिवंत ठेवल्या अन् भागीदारी नोंदवली. निर्धाव चेंडूमुळे दबाव वाढत गेल्याने भारत अडचणीत सापडला. त्यात विराटला नशिबाची साथ न मिळाल्याने बाहेर जावे लागले. विराटने (५४) आणि राहुलने (६६) धावा करून ऑस्ट्रेलियासमोर सन्माजनक आव्हान उभारण्यात मोलाची भूमिका बजावली. अखेर भारतीय संघाने निर्धारित ५० षटकांत सर्वबाद २४० धावा केल्या. २४१ धावांचा पाठलाग करताना कांगारूंनी ट्रॅव्हिस हेडच्या (१३७) शतकी खेळीच्या जोरावर मोठा विजय मिळवला.