नवी दिल्ली : भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीचे जगभरात चाहते आहेत. आताच्या घडीला त्याची गणना जगातील महान फलंदाजांमध्ये केली जाते. मात्र, विराट कोहलीचा मागील दोन-तीन वर्षांत घसरलेला फॉर्म हा क्रिकेट विश्वात चर्चेचा विषय बनला आहे. परंतु, गेल्या वर्षी आशिया चषक ट्वेंटी-20 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावून विराटने शतकांचा दुष्काळ संपवला. त्यानंतर किंग कोहलीने बांगलादेशविरूद्ध वन डे सामन्यात शतक झळकावून दमदार पुनरागमन केले. लक्षणीय बाब म्हणजे विराटने मागील वर्षीच्या ट्वेंटी-20 सामन्यातील सलामीच्या सामन्यात शानदार खेळी करून कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली होती.
विराटने ट्वेंटी-20 विश्वचषकाला नवी ऊर्जा दिली - अख्तर दरम्यान, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर हा देखील कोहलीच्या मोठ्या चाहत्यांपैकी एक आहे. तो विराट कोहलीचे सतत कौतुक का करतो याचा खुलासा खुद्द अख्तरने केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना शोएबने म्हटले, "माझा विश्वास आहे की सचिन तेंडुलकर जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे, पण एक कर्णधार म्हणून तो पराभूत झालेला दिसला. त्याने स्वतःच कर्णधारपद सोडले. मी माझ्या एका मित्रासोबत विराट कोहलीबद्दल बोलत होतो आणि आम्ही दोघेही त्यावरच चर्चा करत होतो. मी म्हणालो की विराट कुठेतरी हरवला आहे आणि जेव्हा तो मन शांत करेल, तेव्हा तो पुन्हा धावा करायला सुरुवात करेल. जेव्हा त्याचे मन तणावमुक्त होते, तेव्हा त्याने ट्वेंटी-20 विश्वचषकाला नवी ऊर्जा दिली."
"आपल्याला हे देखील पाहावे लागेल की कोहलीची जवळपास 40 शतके धावांचा पाठलाग करताना झाली आहेत. लोक म्हणतात की तू विराटची खूप स्तुती करतोस, यावर मी म्हणतो का करू नये? मी हे का करू नये? एक काळ असा होता की विराटच्या शतकांमुळे भारत जिंकायचा", अशा शब्दांत अख्तरने किंग कोहलीचे कौतुक केले. खरं तर विराट सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघाचा भाग आहे. मात्र, हा स्टार फलंदाज आतापर्यंत तीन कसोटी सामन्यांमध्ये मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"