Sikandar Bakht on Rohit Sharma Toss । नवी दिल्ली : वन डे विश्वचषक आता अंतिम टप्प्यात आला आहे. यजमान भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, तर भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानने यंदाच्या पर्वात लाजिरवाणी कामगिरी केली. आपला संघ बाहेर झाल्यानंतर पाकिस्तानचे माजी खेळाडू अजब विधान करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, न्यूझीलंडला पराभवाची धूळ चारून भारतीय संघाने फायनलचे तिकिट मिळवले. सलग दहा विजय मिळवून रोहितसेनेने इथपर्यंत मजल मारली. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पहिला उपांत्य सामना पार पडला, ज्यात टीम इंडियाने ७० धावांनी मोठा विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांनी सांघिक खेळी करून धावांचा डोंगर उभारला. यामध्ये विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्या शतकांचा समावेश होता. पण, धावांचा बचाव करताना सुरूवातीला भारतीय गोलंदाजांना संघर्ष करावा लागला मात्र शमीने सर्वाधिक ७ बळी घेऊन न्यूझीलंडच्या फलंदाजीची कंबर मोडली.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यानंतर पाकिस्तानचा माजी खेळाडू सिकंदर बख्तने रोहित शर्माबद्दल एक मोठे विधान केले. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma Toss) टॉसमध्येच चिटींग करत असल्याचा आरोप पाकिस्तानचा माजी खेळाडू सिकंदर बख्त (Sikander Bakht ) याने केला आहे. बख्तच्या या वादग्रस्त विधानाने नव्या वादाला तोंड फुटले आहे. मात्र पाकिस्तानचा दिग्गज वसिम अक्रमने याप्रकरणी नाराजी व्यक्त केली असून बख्तच्या विधानाची खिल्ली उडवली.
वसिम अक्रमचा संताप
बख्तरच्या विधानाचा दाखला देताना अक्रमने सांगितले की, नाणे कुठे पडेल हे कोण सांगू शकेल का? हे कोणाच्याच हातात नाही. कर्णधाराने नाणे कुठे फेकायचे हे ठरवले जात नाही ते केवळ स्पॉन्सरशिपसाठी असते. त्यामुळे अशा गोष्टी ऐकून मला खूप लाज वाटते.
भारताची अप्रतिम 'शमी' फायनल
न्यूझीलंडला पराभूत करून भारतीय संघाने फायनलचे तिकिट मिळवले आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेता संघ १९ तारखेला भारतासोबत अंतिम सामना खेळेल. मोहम्मद शमीने ५७ धावा देत ७ बळी घेतले अन् संघाला विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ३९७ धावांचा डोंगर उभारला. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने निर्धारित ५० षटकांत ४ बाद ३९७ धावा केल्या. ३९८ धावांच्या तगड्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने चांगली सुरूवात केली. पण, मोहम्मद शमी किवी संघासाठी काळ ठरला अन् त्याने सुरूवातीलाच दोन मोठे झटके दिले. त्यानंतर डॅरिल मिचेल आणि केन विल्यमसन यांनी भागीदारी नोंदवून भारतीय चाहत्यांच्या पोटात गोळा आणला. पण, पन्हा एकदा शमी एक्सप्रेसच्या स्विंगने न्यूझीलंडचा संघ चीतपट झाला आणि भारताने ७० धावांनी विजय साकारला.
Web Title: Former Pakistan player Sikandar Bakht has expressed his displeasure with Wasim Akram, who accused Indian captain Rohit Sharma of cheating during the toss in the match against New Zealand
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.