नवी दिल्ली : भारतात तब्बल १२ वर्षांनंतर वन डे विश्वचषकाचा थरार रंगला आहे. स्पर्धेचा प्रबळ दावेदार म्हणून यजमान भारतीय संघाकडे पाहिले जात आहे. जगभरातील दहा संघ एका ट्रॉफीसाठी पुढचे दीड महिने मैदानात असणार आहेत. पाकिस्तानी संघ देखील सात वर्षांनंतर भारतात आला आहे. अनेक नाट्यमय घडामोडींनंतर पाक संघ भारतात आला. पण, सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानी चाहत्यांना भारतात प्रवेश दिला गेला नाही. २०११ च्या विश्वचषकात टीम इंडियाने शेजाऱ्यांना उपांत्य फेरीत पराभूत फायनलचे तिकिट मिळवले होते. याबद्दल बोलताना पाकिस्तानचा माजी खेळाडू उमर अकमलने एक अजब दावा केला आहे. २०११ चा विश्वचषक शोएब अख्तरसाठी पाकिस्तानला जिंकायचा होता असे त्याने सांगितले.
उमर अकमल म्हणाला की, पाकिस्तानी संघातील खेळाडूबद्दल विचाराल तर, मला माझा भाऊ कामरान अकमलमुळे खूप प्रेरणा मिळते. तसेच पाकिस्तानबाहेर हे काम एबी डिव्हिलियर्स करतो. डिव्हिलियर्सकडे प्रत्येक शॉट होता आणि तो क्रिकेटमधील सर्वोत्तम फिनिशरपैकी एक होता. त्याने मला मधल्या काळात फलंदाजीबद्दल अनेक गोष्टी शिकवल्या. अकमल पाकिस्तानातील एका पोडकास्टमध्ये बोलत होता.
अख्तरसाठी विश्वचषक जिंकायचा होता - अकमल"शोएब अख्तरसाठी आम्हाला २०११ चा विश्वचषक जिंकायचा होता. हा त्याचा शेवटचा विश्वचषक होता, मला त्याला खांद्यावर घेऊन फिरवायचे होते आणि मी शाहिद आफ्रिदीला त्याला अंतिम सामन्यात खेळवण्याची विनंती केली असती. पण, आम्ही भारताकडून उपांत्य फेरीत पराभूत झालो अन् मला धक्का बसला", असेही उमर अकमलने यावेळी सांगितले. खरं तर २०११ च्या विश्वचषकात भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव करून शेजाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला होता.
वन डे विश्वचषकासाठी पाकिस्तानी संघ - बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उप कर्णधार), फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सलमान आगा, सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, सॅम मीर, हारिस रौफ, मोहम्मद वसीम ज्युनिअर, हसन अली आणि शाहीन आफ्रिदी.
राखीव खेळाडू - मोहम्मद हारिस, जमान खान, अबरार अहमद.