नवी दिल्ली : पाकिस्तानी संघाचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमला (Wasim Akram) जगभरातील सर्वोत्तम गोलंदाजीपैकी एक म्हणून ओळखले जाते. तो वनडे क्रिकेटमध्ये ५०० बळी पटकावणारा पहिला खेळाडू आहे. त्याच्या शानदार खेळीच्या जोरावर पाकिस्तानी संघाने अनेक सामन्यात विजय मिळवला आहे. मात्र आता वसीम अक्रम एका वेगळ्याच विषयामुळे चर्चेत आला आहे. त्याने पाकिस्तानच्या माजी खेळाडूवर गंभीर आरोप केले आहेत.
वसीम अक्रमचा मोठा खुलासावसीम अक्रमने त्याच्या आत्मचरित्र 'सुलतान: वसीम अक्रम'मध्ये खुलासा केला आहे की, संघामधील वरिष्ठ सहकारी सलीम मलिकने त्याच्याकडून मसाज करून त्याचे कपडे आणि शूज स्वच्छ करून घेतले होते. त्याला नोकरासारखी वागणूक दिली होती. खरं तर पाकिस्तानी दिग्गज वसीम अक्रमने १९८४ मध्ये पाकिस्तानी संघात पदार्पण केले होते.
ज्युनिअर असल्याचा घेतला फायदावसीम अक्रमने त्याच्या आत्मचरित्रात लिहले की, "सलीम मलिक मी ज्युनिअर असल्याचा फायदा घेत असे. तो नकारात्मक, स्वार्थी होता आणि मला एका नोकराप्रमाणे वागणूक दिली. त्याने मला मालिश करण्यास सांगितले, त्याने मला त्याचे कपडे आणि शूज स्वच्छ करण्याचे आदेश दिले होते."
सलीम मलिकने आरोप फेटाळलेवसीम अक्रमने ज्या सलीम मलिकवर आरोप केले त्या मलिकने आरोप फेटाळले आहेत. तसेच वसीम अक्रमने हे सर्व आपल्या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी लिहिले असल्याचा आरोप मलिकने केला आहे. पाकिस्तानी माध्यमांशी बोलताना मलिकने म्हटले, "मी वसीम अक्रमला फोन करण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्याने फोन उचलला नाही. त्याने जे लिहिले त्यामागचे कारण काय, हे मी त्याला नक्की विचारेन."
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"