पाकिस्तान सुपर लीगच्या नवव्या हंगामाकडे अनेक नामांकित परदेशी खेळाडूंनी पाठ फिरवली. याचाच दाखला देत सातत्याने पाकिस्तानचे माजी खेळाडू खदखद व्यक्त करत आहेत. बडे खेळाडू स्पर्धेत सहभागी न झाल्याने प्रेक्षकांकडूनही हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचा दावा शेजारील देशातील माजी खेळाडू करत आहेत. पीएसएलपूर्वी बांगलादेश प्रीमिअर लीग पार पडली, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू डेव्हिड मिलर सहभागी झाला होता. पण, मिलर पाकिस्तान प्रीमिअर लीगमध्ये सहभागी झाला नाही. अशातच पाकिस्तानचा दिग्गज वसीम अक्रमने एक मोठा दावा केला आहे.
अक्रमचा मोठा खुलासा काही दिवसांपूर्वीच मिलर विवाहबंधनात अडकला. मिलरच्या लग्नाबद्दल बोलताना अक्रमने एक मोठा दावा केला आहे. अक्रमने सांगितले की, डेव्हिड मिलरने पैशांसाठी त्याचे लग्न पुढे ढकलले होते. त्याला बांगलादेश प्रीमिअर लीगमधील फॉर्च्युन बरिशाल फ्रँचायझीच्या मालकाने अखेरचे तीन सामने खेळण्यासाठी १.२५ कोटी रूपये दिले होते. त्यामुळे त्याने लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. अक्रम पाकिस्तान सुपर लीगचे विश्लेषण करताना 'ए स्पोर्ट्स'वर बोलत होता.
दरम्यान, बांगलादेश प्रीमिअर लीगचा अंतिम सामना झाल्यानंतर मिलर विवाहबंधनात अडकला. त्याने त्याची प्रेयसी कॅमिला हॅरिससोबत सातफेरे घेतले. दोघेही मागील मोठ्या कालावधीपासून एकमेकांना डेट करत होते. त्यांचे लग्न केपटाउन येथे झाले. मिलरची पत्नी कॅमिला ही एक पोलो खेळाडू आहे. त्यांच्या लग्नात दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचे आजी माजी खेळाडू सहभागी झाले होते.
मिलर अडकला विवाहबंधनात मिलर आणि कॅमिला दोघांनीही त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. या लग्न सोहळ्याला कुटुंबीय आणि मित्रमंडळींनी हजेरी लावली होती. कॅमिला हॅरिस एक खेळाडू म्हणून डेव्हिड मिलरच्या उंचीला उत्तम प्रकारे पूरक आहे, कारण कॅमिला स्वतः एक व्यावसायिक पोलो खेळाडू आहे. ती आयपीएल २०२३ मध्ये मिलर आणि गुजरात टायटन्सला चीअर करताना दिसली होती.