नवी दिल्ली : काल मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर 2022च्या टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना पार पडला. इंग्लंडने पाच गडी राखून पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि विश्वचषकावर नाव कोरले. पाकिस्तानच्या 8 बाद 137 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने 19 षटकांत 5 बाद 138 धावा केल्या. आदिल राशिद, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, या गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर बेन स्टोक्सने 49 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकार ठोकून नाबाद 52 धावा करून इंग्लंडचा विजय पक्का केला. एकदिवसीय आणि टी-20 असे दोन्ही विश्वचषकाचे जेतेपद एकाच वेळी कायम राखणारा इंग्लंड हा पहिला संघ ठरला. पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या माजी खेळाडूंमध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे. पाकिस्तानचा पराभव होताच संघाचा माजी खेळाडू शोएब अख्तरने नाराजी व्यक्त केली. यावरूनच भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने अख्तरवर निशाणा साधला.
जखमेवर मीठ चोळणं आता बंद कर - अक्रम
दरम्यान, अख्तर-शमी यांच्या वादात आता पाकिस्तानचा माजी खेळाडू वसीम अक्रमने उडी घेतली आहे. शेजाऱ्यांच्या पराभवानंतर शोएब अख्तरच्या जखमेवर मीठ शिंपडत शमीने लिहिले, "सॉरी भाऊ, यालाच कर्म म्हणतात." शमीच्या या उत्तरानंतर त्याला पाकिस्तानी लोकांकडून खूप ट्रोल केले जात आहे. अशातच वसीम अक्रम याने देखील शमीला एक सल्ला दिला आहे. "आपण तटस्थ राहिले पाहिजे. भारतीय त्यांच्या देशाबद्दल देशभक्त आहेत, मला त्याबाबत माहिती आहे. आम्ही आमच्या देशाबद्दल देशभक्त आहोत. पण त्याऐवजी जखमेवर मीठ चोळणं आणि ट्विट करणे बस झालं हे करू नका यार", असे अक्रमने म्हटले.
लाईक्ससाठी असे करू नये - मिस्बाह उल हक
पाकिस्तानमधील स्पोर्ट्स या वृत्तवाहिनीच्या प्रोग्राममध्ये बोलताना अक्रमने हे विधान केले. या चर्चेत पाकिस्तानचा माजी कर्णधार मिस्बाह उल हक देखील सहभागी होता. शमी-अख्तर वादावर मिस्बाहने म्हटले, "तुम्ही केवळ काही 'लाईक्स'साठी असे करू नये. मग ते भारताचे असो किंवा पाकिस्तानचे किंवा इतर कोणत्याही देशाचे आपण सर्व एक कुटुंब आहोत. त्यामुळे आपण एकमेकांचा आदर केला पाहिजे आणि आपली मते आदरपूर्वक मांडली पाहिजेत. आमचीही काही जबाबदारी आहे."
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Former Pakistan player wasim akram has commented on the controversy between Shoaib Akhtar and Mohammad Shami
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.