नवी दिल्ली : टी-20 विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारतीय संघाचा इंग्लंडकडून दारूण पराभव झाला. या पराभवासोबतच भारतीय संघाचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे. 4 साखळी सामने जिंकून भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. मात्र उपांत्य फेरीत काल इंग्लिश संघाने भारताचा 10 गडी राखून मोठा पराभव केला. भारताने दिलेल्या 169 धावांच्या आव्हानाचा पाठलाग इंग्लिश संघाने केवळ 16 षटकांत पूर्ण केला. या विजयासह इंग्लिश संघाने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. फायनलचा सामना 13 तारखेला पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. भारताचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर पाकिस्तानचा माजी खेळाडू वसीम अक्रमने रोहितसेनेवर टीका केली आहे.
भारतीय संघाच्या पराभवानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले होते की, बीग बॅश लीगचा भारतीय खेळाडूंना टी-20 खेळताना फायदा होऊ शकतो. मात्र त्यामुळे कसोटी क्रिकेट सेटअपला हानी पोहोचेल. बिग बॅश लीगवरील द्रविड यांच्या वक्तव्यावरून पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंवर निशाणा साधला आहे.
IPL खेळून काय फरक पडला - अक्रम
पाकिस्तानातील ए स्पोर्ट्सवर बोलताना अक्रमने म्हटले, "प्रत्येकाला वाटत होते की आयपीएलमुळे भारतीय संघात खूप फरक पडेल पण तसे झाले नाही. आयपीएल सुरू झाल्यापासून भारताला टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद एकदाही जिंकता आलेले नाही. मग काय फरक पडला काय दिवा लावला. मी एका मुलाखतीत ऐकले होते की त्यांचे खेळाडू एकही विदेशी लीग खेळत नाहीत. त्यांना लीग खेळण्याची परवानगी मिळाली तरी त्यांच्या दृष्टिकोनात काय फरक पडणार आहे."
खरं तर बीसीसीआयच्या नियमांनुसार भारतीय संघाचा कोणताही खेळाडू बिग बॅश लीग, कॅरेबियन प्रीमियर लीग इत्यादी कोणत्याही परदेशी लीगमध्ये सहभागी होऊ शकत नाही. जर एखाद्या भारतीय खेळाडूला परदेशी लीगमध्ये भाग घ्यायचा असेल तर त्याला भारतीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घ्यावी लागेल. त्यामुळे भारतीय खेळाडू केवळ आयपीएलमध्ये खेळताना दिसतात. तर इतर देशातील खेळाडू बीबीएलशिवाय पाकिस्तान सुपर लीगमध्ये देखील सहभागी होतात.
हेल्स-बटलरसमोर भारतीय गोलंदाज गारद
2022च्या टी-20 विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताचा इंग्लंडकडून लाजिरवाणा पराभव झाला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 6 बाद 168 धावा केल्या होत्या, ज्याचा पाठलाग करताना इंग्लिश संघाने 10 गडी राखून सहज विजय मिळवला. भारताकडून विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी शानदार अर्धशतकी खेळी केली. मात्र भारतीय गोलंदाजांना एकही बळी पटकावता आला नाही. अखेर इंग्लिश संघाने 16 षटकांतच 169 धावा करून फायनलमध्ये प्रवेश केला. इंग्लंडकडून सलामीवीर कर्णधार जोस बटलर आणि 80 तर ॲलेक्स हेल्स यांनी अनुक्रनमे 80 आणि 89 धावांची नाबाद खेळी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Former Pakistan player Wasim Akram has said what has changed in Indian players after playing IPL
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.