Join us  

ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज

वसीम अक्रम म्हणजे शेजारील देशाच्या क्रिकेटच्या इतिहासातील एक मोठे नाव.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 12:28 PM

Open in App

Wasim Akram on Navjot Singh Sidhu : पाकिस्तानी संघाचा माजी खेळाडू वसीम अक्रम म्हणजे शेजारील देशाच्या क्रिकेटच्या इतिहासातील एक मोठे नाव. अक्रम म्हणजे धारधार गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा घातक खेळाडू. ९० च्या दशकात सचिन तेंडुलकरसारख्या महान फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करताना इतिहास रचला. अशातच अक्रमने तेव्हाच्या काळात फिरकीपटूंविरुद्ध जबरदस्त फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाचे नाव जाहीर केले आहे. वसीम अक्रमनेसचिन तेंडुलकर आणि श्रीलंकेचा दिग्गज सनथ जयसूर्या यांचे नाव न घेता नवज्योतसिंग सिद्धू यांची सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना केली. वसीम अक्रम थेट म्हणाला की, ९० च्या दशकात नवज्योत सिंग सिद्धू असा फलंदाज होता जो फिरकीपटूंविरुद्ध जबरदस्त फलंदाजी करत असे. मी त्याला फिरकीपटूंविरुद्ध सर्वोत्तम फलंदाज मानतो.

अक्रमने सांगितले की, सिद्धू हा खूप चांगला खेळाडू होता. मी त्याला समोरून कधीच गोलंदाजी केली नाही. योजना आखून त्याच्याविरूद्ध चेंडू टाकायचो. तो खूप छान खेळायचा. पण, ९० च्या दशकात त्याच्यासारखे फिरकीपटूंविरुद्ध कोणीही खेळले नाही, असे माझे ठाम मत आहे. मला वाटते की, ९० च्या दशकात फिरकीपटूंविरुद्ध खेळणारा तो जगातील सर्वोत्तम फलंदाज होता. तो फिरकीपटूंचा सामना करण्यात चांगला तरबेज होता. अक्रम 'स्पोर्ट्सकीडा'शी बोलत होता. 

सिद्धू सर्वोत्तम फलंदाजमाजी खेळाडू आणि विद्यमान समालोचक सिद्धू यांच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल भाष्य करायचे झाले तर, त्यांनी भारतीय संघासाठी ५१ कसोटी सामने खेळले असून, त्यांच्या नावावर ३२०२ धावांची नोंद आहे. त्यांनी कसोटीत ९ शतके आणि १५ अर्धशतके झळकावली आहेत. सिद्धू यांनी १३६ वन डे सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांना ४४१३ धावा करण्यात यश आले. या फॉरमॅटमध्ये त्यांनी ६ शतके आणि ३३ अर्धशतके झळकावली आहेत. 

दरम्यान, ९० च्या दशकात सिद्धूंची गोलंदाजांमध्ये वेगळीच दहशत होती. विशेषत: फिरकीपटूंविरुद्ध त्यांची फलंदाजी पाहण्यासारखी होती. सिद्धू फिरकीपटूंविरुद्ध लांब षटकार मारायचे. आजही जागतिक क्रिकेट त्यांच्या फलंदाजीचे कौतुक करत आहे. 

टॅग्स :नवज्योतसिंग सिद्धूवसीम अक्रमपाकिस्तानसचिन तेंडुलकर