Shahid Afridi vs Danish Kaneria - पाकिस्तान क्रिकेटमधील स्टार, वादग्रस्त व्यक्ति अन् सतत चर्चेत राहणाऱ्या शाहिद आफ्रिदीवर गंभीर आरोप करण्यात आले आहे. संघातील हिंदू खेळाडूविरोधात बरेच कटकारस्थान रचल्याचा आरोप पाकिस्तानच्या माजी अष्टपैलू खेळाडूवर करण्यात आला आहे. पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कानेरिया याने हे आरोप केले आहेत. कानेरिया सातत्याने पाकिस्तान क्रिकेटमधील 'पोलखोल' करत आला आहे आणि आता आफ्रिदीवरील आरोपामुळे जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता दिसतेय.
IANS ला दिलेल्या मुलाखतीत कानेरियाने आफ्रिदीला खोटारडा म्हटले आणि हिंदू असल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट संघाकडून खेळताना त्याने आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोपही कानेरियाने केला. आफ्रिदीवर असा आरोप करणारा कानेरिया हा पहिलाच खेळाडू नाही. याआधी पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तर यानेही कानेरियावर पाकिस्तानच्या संघात अन्याय झाल्याचा दावा केला होता. तो हिंदू असल्यामुळे काही खेळाडू त्याला सापत्न वागणूक देत असल्याचेही अख्तरने म्हटले होते.
कानेरिया म्हणाला,''माझी समस्या लोकांसमोर मांडणारा अख्तर हा पहिला व्यक्ती होता. त्याला माझा सलाम. त्याने या मुद्याला वाचा फोडल्यानंतर त्याच्यावर काही अधिकाऱ्यांकडून दबाव टाकला गेला. त्यानंतर त्याने या विषयावर बोलणे बंद केले, परंतु माझ्यासोबत जे घडले ते सत्य लपून राहिले नाही. शाहिद आफ्रिदीने नेहमी माझा अपमान केला. आम्ही कोणत्यातरी विभागासाठी सोबत खेळायचो, परंतु त्याने मला बाकावरच बसवून ठेवले. त्याने मला वन डे क्रिकेट स्पर्धेत खेळू दिले नाही.''
''त्याला मी संघात नको होतो. तो खोटारडा आहे आणि मॅनिपुलेटर आहे, कारण तो एक चारित्र्यहीन माणूस आहे. पण, माझं संपूर्ण लक्ष हे क्रिकेटवरच असल्याने मी या गोष्टींकडे दुर्लक्ष केले. तो संघातील अन्य खेळाडूंना माझ्याविरोधात भडकवायचा, त्यांचे कान भरायचा.. माझ्या कामगिरीवर तो जळायचा... मी पाकिस्तान संघाकडून खेळलो, याचा मला अभिमान आहे,''असेही कानेरिया म्हणाला.
स्पॉट फिक्सिंग प्रकरणात कानेरियाला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने निलंबित केले. त्याने १८ वन डे सामन्यांत पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले. ''माझ्यावर स्पॉट फिक्सिंगचे चुकीचे आरोप लावण्यात आले. या प्रकरणातील ज्या व्यक्तिसोबत माझं नाव जोडलं गेलं तो आफ्रिदीचाही चांगला मित्र आहे. पण, मलाच का लक्ष्य केले गेले, याची कल्पना नाही. मी पीसीबीकडे बंदी हटवण्याची विनंती करतोय. इतरही आरोपी खेळाडूंची बंदी हटवली गेली, परंतु माझीच नाही,''असेही ४१ वर्षीय फिरकीपटू म्हणाला.