यंदाचा वन डे वर्ल्ड कप भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे आणि आतापासूनच हा वर्ल्ड कप कोण व कसं जिंकणार याचे विश्लेषण सुरू झाले आहे. माजी खेळाडू तर आपापला संघ कसा तुल्यबळ आहे, हे पटवून देताना दिसत आहेत. त्यात पाकिस्तानचे माजी खेळाडू मागे राहिले तर नवल... भारतात हा वर्ल्ड कप होणार असल्याने अर्थात यजमान संघ जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेच, पण त्यांना टक्कर देण्यासाठी गतविजेता इंग्लंड व पाचवेळा वर्ल्ड कप उंचावणारा ऑस्ट्रेलियाही सज्ज आहे. पाकिस्तानचा माजी कर्णदार वसीम अक्रम याच्यामते बाबर आजम अँड टीम यंदा बाजी मारणार आहे.
१९९२ च्या वर्ल्ड कप फायनलमधील प्लेअर ऑफ दी मॅच अक्रम यांनी पाकिस्तान का जिंकणार, यामागची अनेक कारणं सांगितली. अक्रमने पाकिस्तानला वर्ल्ड कप विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हटले आहे. जलदगती गोलंदाज शाहिन आफ्रिदी हा त्यामागचं प्रमुख कारण असल्याचं अक्रम म्हणाला. ''शाहिन आफ्रिदी सध्या तुफान फॉर्मात आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने पाकिस्तान सुपर लीगचे सलग दुसऱ्यांदा जेतेपद पटकावले. ऑल राऊंडर म्हणून तो तयार होतोय. त्याच्यासोबत हॅरिस रौफ व नसीम शाह हेही जलदगती गोलंदाज आहेत. मोहम्मद हस्नैन व इहसानुल्लाह हेही युवा जलदगीत गोलंदाज आहेत. हा वर्ल्ड कप भारतात होणार आहे आणि पाकिस्तानकडे दमदार गोलंदाजाची फौज आहे. त्यामुळेच पाकिस्तानचे येथे विजयाचे चान्स जास्त आहेत,''असे अक्रम म्हणाला.
आफ्रिदी हा जगातील सर्वोत्तम जलदगती गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने त्याच्या फलंदाजीतही प्रचंड सुधारणा केलेली आहे आणि नुकत्याच पार पडलेल्या पाकिस्तान सुपर लीग फायनलमध्ये लाहोर कलंदर्सकडून त्याने त्याची प्रचिती दिली. त्याने अंतिम सामन्यात १५ चेंडूंत ४४ धावा चोपल्या आणि त्यानंतर चार विकेट्सही घेतल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"