Join us  

भारताची 'पूजा' पाकिस्तानच्या क्रिकेटपटूशी विवाह करणार; लग्नाआधी इस्लाम धर्म स्वीकारणार

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर भारतीय तरुणीशी लग्न करणार आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2024 12:25 PM

Open in App

raza hasan pakistani cricketer : पाकिस्तानचा आणखी एक क्रिकेटपटू भारताचा जावई होणार आहे. या आधी शोएब मलिकने भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झासोबत लग्न केले होते. मग १२ वर्षांनी या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानसाठी ११ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या रझा हसनने नुकतेच भारतीय हिंदू मुलगी पूजा बोमनशी लग्न करणार असल्याचे स्पष्ट केले. हे जोडपे पुढच्या वर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये लग्न करणार असल्याचे कळते. या लग्नाआधी पूजा इस्लाम धर्म स्वीकारणार असल्याचे हसनने सांगितले. दोघांनी काही दिवसांपूर्वी अमेरिकेतच एंगेजमेंट केली. 

खरे तर रझा हसनने पाकिस्तानकडून मोजकेच सामने खेळले आहेत. तो पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सियालकोटचा आहे. २०१२ मध्ये त्याने पाकिस्तान क्रिकेट संघात पदार्पण केले होते. त्याने पुढील दोन वर्षांत एकूण १० ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय आणि एकमेव वन डे सामना खेळला. फिरकी डावखुरा गोलंदाज म्हणूनही त्याची ओळख असून, त्याला केवळ एक बळी घेता आला. 

खराब फॉर्मचा सामना करत असलेल्या हसनला पुन्हा पाकिस्तानी संघात पुनरागमन करता आले नाही. तेव्हा त्याने अमेरिकेत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानमधील स्टार्टअप कराचीने दिलेल्या माहितीनुसार, रझा अमेरिकेत भारतीय हिंदू मुलगी पूजा बोमनला भेटला मग त्यांची मैत्री झाली आणि आता ते लग्न करणार आहेत. हसनने सांगितले की, पूजा लग्नाच्या आधी इस्लाम धर्म स्वीकारणार आहे. हसन रझापूर्वी पाकिस्तानचा माजी कर्णधार झहीर अब्बास, शोएब मलिक, मोहसीन खान आणि हसन अली या प्रसिद्ध क्रिकेटपटूंनीही भारतीय मुलींशी लग्न केले आहे.

दरम्यान, हसन २०२१ पासून क्रिकेटपासून दूर झाला. तेव्हापासून त्याने कोणतेही व्यावसायिक सामने खेळले गेले नाहीत. पाकिस्तानात वास्तव्यास असताना त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये ४८ प्रथम श्रेणी, ८० लिस्ट ए आणि ७७ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. त्याने या तीन फॉरमॅटमध्ये अनुक्रमे १४९, १२२ आणि ९० बळी घेतले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर एक शतक आणि चार अर्धशतकांची नोंद आहे.

टॅग्स :पाकिस्तानभारतऑफ द फिल्डलग्न