AFG vs PAK : अफगाणिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने ( Shoaib Akhtar ) पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि संघावर निशाणा साधला आहे. हा परफॉर्मन्स पाहून मी जास्त काहीच बोलू शकत नाही, असे अख्तर म्हणाला. खुदा के लिए योग्य माणसाला योग्य ठिकाणी ठेवा. अफगाणिस्तानने पाकिस्तानने ठेवलेले २८३ धावांचे लक्ष्य केवळ २ विकेट गमावून पूर्ण केले. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानचा हा सलग तिसरा पराभव आहे आणि यानंतर उपांत्य फेरी गाठण्याचा त्यांचा मार्ग खडतर झाला आहे.
शोएब अख्तरने त्याच्या यूट्यूब चॅनलवर राग व्यक्त केला, “हा परफॉर्मन्स पाहून जास्त काही बोलू शकत नाही. अध्यक्ष कोणीही बनतोय आणि आम्ही कधीपर्यंत साधारण लोकांना समर्थन देत राहणार. तुम्ही सरासरी लोकांना शीर्षस्थानी ठेवता आणि त्यामुळे अशी सरासरी कामगिरी पाहत राहाल. आज टीव्हीवर जे दिसले ते पीसीबीचे खरे प्रतिबिंब आहे. गेल्या २०-३० वर्षांत तुम्ही क्रिकेटमध्ये जे काही निवडत आहात त्याचा हा थेट परिणाम आहे.
तो म्हणाला की सध्याच्या पाकिस्तान संघात असा एकही क्रिकेटर नाही जो तरुणांना या खेळात येण्यासाठी प्रेरित करू शकेल. शोएब म्हणाला, “मला एक गोष्ट सांगा, या संघात असा कोणी क्रिकेटर आहे का, जो कोणालाही प्रेरणा देऊ शकेल? मी वकार युनूस, वसीम अक्रम, इम्रान खान, स्टीव्ह वॉ, अॅलन बॉर्डर, विव्ह रिचर्ड्स यांना पाहिले आहे. पाकिस्तान संघात असा कोणता क्रिकेटर आहे जो तरुणांना क्रिकेट निवडण्यासाठी प्रेरित करू शकेल? लोक आमचे व्हिडिओ का पाहत आहेत कारण आम्ही तरुण पिढीला प्रेरित केले आहे.”
अख्तर म्हणाला, “मी पाकिस्तानसाठी खेळलो आहे आणि आज माझे मन रडत आहे. मी पाकिस्तानला पाठिंबा देत राहीन. यावेळी मी बाबरसोबत असतो तर त्याला आता कर्णधारपद सोडण्यास सांगितले असते. यापेक्षा वाईट काहीही होऊ शकत नाही. बाबर आझममध्ये हिंमत आहे का? त्यांच्यात सहनशक्ती आहे का? त्यांच्यात क्षमता आहे का? तो १९९२ मध्ये इम्रान खानच्या पराक्रमाची पुनरावृत्ती करू शकेल का? शाहीन वसीम अक्रम बनू शकते का? हरिस रौफ आकिब जावेद बनू शकतो का? हा संघ जिंकू शकेल का? माझा या संघावर विश्वास आहे पण त्यांचा स्वतःवर विश्वास आहे का? हे फक्त अल्लाहलाच कळेल.”