ICC ODI World Cup 2023 Semi Final | नवी दिल्ली : ५ ऑक्टोबरपासून भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. सलामीचा सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार असून कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान हे १४ तारखेला आमनेसामने असतील. भारताचा या स्पर्धेतील सलामीचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. आगामी मोठ्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर जाणकारांसह माजी क्रिकेटपटू आपापली मतं मांडत आहेत. अशातच दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सने एक भाकीत वर्तवले असून स्पर्धेचे सेमीफायनलिस्ट सांगितले आहेत.
विश्वविजेत्या इंग्लंड आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 'अजिंक्य' राहिलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची आताच्या घडीला क्रिकेट जगतात दहशत आहे. त्यामुळे हे दोन्हीही संघ आगामी विश्वचषकात उपांत्य फेरी गाठतील, असा विश्वास डिव्हिलियर्सला आहे. याशिवाय भारत आणि दक्षिण आफ्रिका हे संघ देखील उपांत्य फेरीची शर्यत जिंकतील अन् आपली जागा पक्की करतील. भारतीय संघात मागील काही दिवसांपासून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. पण, अद्याप विश्वचषकासाठी निश्चित संघ तयार झाला नसून हे त्यांच्यासाठी आव्हानात्मक असेल. मात्र आशिया चषकानंतर यावर तोडगा काढला जाईल, असेही डिव्हिलियर्सने नमूद केले.
डिव्हिलियर्सचं भाकीत आफ्रिकन दिग्गजाने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना आपल्या संघाचा बचाव केला. दक्षिण आफ्रिकेच्या संघात बदल होणं अत्यंत गरजेचं असल्याचं त्यानं सांगितलं. "आमचा दक्षिण आफ्रिकेचा संघ देखील विश्वचषकात असणार आहे, या संघात फारसा अनुभव नसलेल्या पण चांगल्या खेळाडूंची मोठी फळी आहे. मला माहीत आहे की, आमच्या वन डे आणि ट्वेंटी-२० संघाचे प्रशिक्षक रॉब वॉल्टर नेमकं काय करत आहेत. पण, संघात बऱ्यापैकी बदल होणं आवश्यक आहे", असे डिव्हिलियर्सने आणखी सांगितले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मागील आठवड्यात वन डे विश्वचषक स्पर्धेचे नवीन वेळापत्रक जाहीर केले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात १५ ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्याची तारीख बदलून १४ ऑक्टोबर करण्यात आली आहे. १५ ऑक्टोबरपासून हिंदू सण नवरात्रीला सुरूवात होत असल्याने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची तारीख बदलण्यात आली.
विश्वचषकातील भारताचे सामने - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - ८ ऑक्टोबर, चेन्नईभारत विरुद्ध अफगाणिस्तान - ११ ऑक्टोबर, दिल्लीभारत विरुद्ध पाकिस्तान - १४ ऑक्टोबर, अहमदाबादभारत विरुद्ध बांगलादेश - १९ ऑक्टोबर, पुणेभारत विरुद्ध न्यूझीलंड - २२ ऑक्टोबर, धर्मशालाभारत विरुद्ध इंग्लंड - २९ ऑक्टोबर, लखनौभारत विरुद्ध श्रीलंका - २ नोव्हेंबर, मुंबईभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - ५ नोव्हेंबर, कोलकाताभारत विरुद्ध नेदरलँड्स - १२ नोव्हेंबर, बंगळुरू