भारतीय संघाने वन डे विश्वचषकात विक्रमी कामगिरी करताना सलग सात सामने जिंकले आहेत. यंदाच्या विश्वचषकाचा प्रबळ दावेदार म्हणून भारतीय संघाकडे पाहिले जाते. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिल्या क्रमांकासाठी रस्सीखेच सुरू आहे. पण, श्रीलंकेचा दारूण पराभव करून टीम इंडियाने पुन्हा एकदा पहिले स्थान पटकावले. विश्वचषक कोण उंचावणार याबद्दल अनेक जाणकार आपापली मतं मांडत आहेत. अशातच दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सने आपला संघ फेव्हरेट असल्याचे म्हटले. पण, जर दक्षिण आफ्रिकेला किताब जिंकण्यात अपयश आले तर भारताने विश्वचषक उंचावलेला पाहायला आवडेल, असेही मिस्टर ३६०ने नमूद केले.
आयसीसीशी बोलताना डिव्हिलियर्सने म्हटले, "भारत माझा दुसरा आवडता संघ आहे. कारण भारतीय संघात अष्टपैलू खेळाडू आहेत. परिस्थिती पाहून कसा खेळ करायचा हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. आताच्या घडीला भारतीय संघाचा दबदबा आहे." टीम इंडियाची चालू विश्वचषकातील आतापर्यंतची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रात रोहित शर्माच्या संघाची कामगिरी चांगली आहे. भारत आपल्या आगामी सामन्यात रविवारी दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे.
दक्षिण आफ्रिकेने देखील शानदार कामगिरी करून आपली छाप सोडली आहे. टेम्बा बवुमाच्या नेतृत्वातील आफ्रिकन संघ सात सामन्यांत सहा विजयांसह आणि १२ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे रविवारचा सामना टेबल टॉपर्स यांच्यात होईल. दक्षिण आफ्रिकेला केवळ नवख्या नेदरलॅंड्सकडून पराभव पत्करावा लागला. आफ्रिकन संघ चारवेळा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहचला आहे, मात्र एकदाही अंतिम फेरी गाठू शकला नाही.