मुंबई : वन डे विश्वचषकापूर्वी भारतीय संघ एका नव्या अध्यायाचा सामना करत आहे. बीसीसीआय नवनवीन खेळाडूंना आजमावून पाहत आहे. अलीकडेच पार पडलेल्या वेस्ट इंडिजविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील टीम इंडियाला पराभव स्वीकारावा लागला. सध्या भारतीय संघ जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात आयर्लंडविरूद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळत आहे. सलामीचे दोन सामने जिंकून पाहुण्या संघाने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. या मालिकेतून संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहने पुनरागमन केलं आहे. भारतीय संघातील सद्य घडामोडींवर भाष्य करताना माजी खेळाडू अभिषेक नायरनं विविध बाबींवर प्रकाश टाकला. तो जिओ सिनेमाच्या माध्यमातून क्रीडा पत्रकारांशी बोलत होता.
बुमराहच्या कामगिरीचे कौतुक करताना त्यानं सांगितलं की, कर्णधार म्हणून जसप्रीत बुमराहनं चांगली कामगिरी केली आहे. मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन करताना बुमराहच्या जोरदार कमबॅकनं सर्वांची मनं जिंकली. तसेच मला आशा आहे की उद्याच्या सामन्यात आवेश खानला संधी मिळू शकते. कारण अर्शदीप सिंगला वगळून युवा खेळाडूला आजमावले जाऊ शकते. या एका बदलाशिवाय मला वाटत नाही प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल होईल, असंही त्यानं सांगितलं.
अभिषेक नायरचं परखड मत
संजू सॅमसनची आशिया चषकाच्या संघात राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. लोकेश राहुलला बसवून संजूला स्थान द्यायला हवं होतं का? असं विचारलं असता अभिषेकनं म्हटलं, "यावर उत्तर देणं खरंच कठीण आहे. संजूनं वेस्ट इंडिज आणि आयर्लंडविरूद्धची मालिका खेळली. संजू सॅमसनला वेस्ट इंडिज दौऱ्यात चुकीच्या क्रमांकावर खेळवलं नाही. पण त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याला आणखी संयम पाळावा लागेल. पण, राहुलला वर्ल्ड कपपूर्वी संधी मिळावी यासाठी आशिया चषकाच्या संघात स्थान देण्यात आलं आहे. आयर्लंडविरूद्धच्या मालिकेत रिंकू सिंगनं पहिल्याच सामन्यात 'सामनावीर'चा पुरस्कार जिंकून भविष्यातील स्टार असल्याचं दाखवून दिलं.
तसेच श्रेयस अय्यरला पाकिस्तानविरूद्धच्या मोठ्या सामन्यात संधी मिळेल. त्याच्यासाठी हे साजहिकच अवघड असेल. पण, पाकिस्तानविरूद्धचा सामना नेहमीच लक्षणीय असतो. या सामन्यापूर्वी सामने खेळा किंवा नका पण अशा सामन्यांमध्ये खूप दबाव असतो. अय्यर अनुभवी खेळाडू असून तो अनुभवाचा योग्य फायदा घेईल आणि दबाव हाताळेल अशी मला आशा आहे, असं 'जिओ सिनेमावरील एक्सपर्ट' अभिषेक नायरनं स्पष्ट केलं.