मागील काही दिवसांपासून क्रिकेट विश्वात एकच चर्चा रंगली आहे ती म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने या पदासाठी अर्ज मागवले आहेत. या पदाच्या शर्यतीत माजी खेळाडू गौतम गंभीर आघाडीवर आहे. आता खुद्द गंभीरने याबद्दल मौन सोडले असून, आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रीय संघाचा प्रशिक्षक होण्यापेक्षा कोणता मोठा सन्मान नाही, असे गंभीरने सांगितले.
गंभीर म्हणाला की, तुमच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक होण्यापेक्षा मोठा सन्मान नाही. या पदावर असताना तुम्ही १४० कोटी भारतीयांचे आणि जगभरातील लोकांचेही प्रतिनिधित्व करत असता. जेव्हा तुम्ही भारताचे प्रतिनिधित्व करत असता... तेव्हा यापेक्षा मोठा सन्मान तो काय असू शकतो? पण मी भारताला विश्वचषक जिंकण्यासाठी कशी मदत करू शकतो? मला वाटते की भारताला विश्वचषक जिंकण्यास मदत करणारे १४० कोटी भारतीय आहेत. जर प्रत्येक भारतीय आमच्यासाठी प्रार्थना करू लागला आणि आम्ही त्यांचे प्रतिनिधित्व करू लागलो तर भारत विश्वचषक जिंकेल यात शंका नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे निर्भय असणे गरजेचे आहे. जर तुम्ही मला विचाराल तर होय, मला भारतीय संघाचे प्रशिक्षक बनायला आवडेल.
दरम्यान, मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मे होती. यासाठी किती जणांनी अर्ज केले आहेत, हे देखील समोर आले आहे. यामध्ये नरेंद्र मोदी, अमित शाह, सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी अशा काही बनावट नावांचा समावेश आहे. BCCI ने अलीकडेच मुख्य प्रशिक्षकपदासाठी रिकी पाँटिंग आणि जस्टिन लँगर यांच्याशी संपर्क साधण्यास नकार दिला होता.
BCCI च्या प्रशिक्षकपदासाठी अटी -- नवीन प्रशिक्षक हा १ जुलै, २०२४ ते ३१ डिसेंबर २०२७ या काळासाठी असणार आहे. - प्रशिक्षक पदासाठी उच्छुक उमेदवाराचे वय ६० वर्षांपेक्षा कमी असावे.- कमीतकमी ३० कसोटी, ५० वनडे सामने खेळण्याचा अनुभव असावा तसेच कमीतकमी दोन वर्षांचा एखाद्या पूर्णवेळ संघाचा प्रशिक्षक पदाचा अनुभव असावा.