harbhajan singh champions trophy : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स लीग २०२४ च्या अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान हे संघ भिडले. इंग्लंडच्या धरतीवर झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला. यासह युनूस खानच्या नेतृत्वातील पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला. या विजयानंतर हरभजन आणि रैनाने हे अनोखे सेलिब्रेशन केले. पण, या सेलिब्रेशनवरून वाद चिघळला असल्याचे दिसते. चाहत्यांचा रोष, अनेकांनी केलेली टीका आणि पॅरा बॅडमिंटनपटूने उठवलेल्या आवाजानंतर अखेर माजी खेळाडू हरभजन सिंगने माफी मागत कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचे स्पष्ट केले.
पॅरा बॅडमिंटन स्टार मानसी जोशीने क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि सुरेश रैना यांच्यावर त्यांच्या एका कृतीचा दाखला देत बोचरी टीका केली. भज्जी आणि रैनासह युवराज सिंगने विजयानंतर केलेले भन्नाट सेलिब्रेशन सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. पण, आता मानसीने यावर आक्षेप घेत अपंगांचा अपमान केला असल्याचे म्हटले आहे. माजी खेळाडूंच्या व्हायरल व्हिडीओवर व्यक्त होताना मानसी जोशीने आपला संताप व्यक्त केला.
वाद चिघळताच हरभजनने सोशल मीडियावर एक पोस्ट करत माफी मागितली. तो म्हणाला की, इंग्लंडमध्ये चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर सोशल मीडियावर 'तौबा तौबा'च्या आमच्या अलीकडील व्हिडिओंबद्दल अनेकांनी तक्रार केली. त्यांना मला सांगायचे आहे की, कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. आम्ही प्रत्येक व्यक्ती आणि समुदायाचा आदर करतो आणि हा व्हिडीओ केवळ मनोरंजनासाठी होता. सतत १५ दिवस क्रिकेट खेळल्यानंतर आमचे शरीर थकले होते. तरीदेखील मी सर्वांची माफी मागतो. आम्ही कोणाचाही अपमान किंवा अपमान करण्याचा प्रयत्न करत नाहीये... तरीही जर लोकांना वाटत असेल की आम्ही काही चूक केली आहे तर त्यांनी आम्हाला माफ करावे. पण, कृपया सर्वांनी हे इथेच थांबवा.
प्लीज, अपंगांची थट्टा करू नका! पॅरा बॅडमिंटन स्टार मानसी जोशी भारताच्या 'चॅम्पियन्स'वर संतापली
मानसी जोशीने नाराजी व्यक्त करताना म्हटले की, जर तुम्ही पोलिओ असलेल्या लोकांच्या चालण्याच्या पद्धतींची थट्टा करत असाल तर हे खूप दुर्दैवी आहे. यामुळे भारतातील अपंग मुलांवर गुंडगिरी, अन्याय करणे सहज शक्य होईल. हे सेलिब्रेशन नसून अपंग लोकांची थट्टा केली जात आहे. खरे तर मानसीने तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर स्टोरीच्या माध्यमातूनही याविरोधात आवाज उठवला. अनेकांनी तिला समर्थन देताना तिच्या मुद्द्याच्या समर्थनार्थ पोस्ट केल्या आहेत.