Team India New Head Coach 2024 : भारतीय क्रिकेट संघाचे विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ लवकरच संपुष्टात येणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) नवीन प्रशिक्षकाच्या शोधात आहे. पुढील महिन्यात टीम इंडिया ट्वेंटी-२० विश्वचषकासारख्या मोठ्या व्यासपीठावर खेळणार आहे. अशातच भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने प्रशिक्षकपदासाठी इच्छा व्यक्त केली आहे. खरे तर हरभजन सध्या आयपीएलमध्ये समालोचक म्हणून कार्यरत आहे. याशिवाय तो आम आदमी पार्टीचा राज्यसभेचा खासदार देखील आहे. हरभजन सिंग म्हणाला की, मी प्रशिक्षकपदासाठी अर्ज करेन की नाही हे मला माहीत नाही. भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणजे खेळाडूंना, संघाला हाताळणे होय. खेळाडूंना कव्हर ड्राईव्ह अथवा कोणता फटका कसा मारायचा हे शिकवणे हे नाही. कारण हे खेळाडूंना चांगलेच माहीत आहे. प्रशिक्षक म्हणून तुम्ही आणखी काही देऊ शकता हे महत्त्वाचे असते. क्रिकेटने मला खूप काही दिले आहे आणि जर मला ते परत करण्याची संधी मिळाली तर जास्त आनंद होईल. 'भज्जी' ANI या वृत्तसंस्थेशी बोलत होता.
बीसीसीआयने प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले आहेत. यामध्ये काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे हरभजन या पदासाठी अर्ज करतो का हे पाहण्याजोगे असणार आहेत. भज्जीशिवाय गौतम गंभीर, महिला जयवर्धने आणि चेन्नई सुपर किंग्सचा प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांची देखील या पदासाठी नावे चर्चेत आहेत.
BCCI च्या प्रशिक्षकपदासाठी अटी -- नवीन प्रशिक्षक हा १ जुलै, २०२४ ते ३१ डिसेंबर २०२७ या काळासाठी असणार आहे. - प्रशिक्षक पदासाठी उच्छुक उमेदवाराचे वय ६० वर्षांपेक्षा कमी असावे- कमीतकमी ३० कसोटी, ५० वनडे सामने खेळण्याचा अनुभव असावा तसेच कमीतकमी दोन वर्षांचा एखाद्या पूर्णवेळ संघाचा प्रशिक्षक पदाचा अनुभव असावा
विश्वचषकासाठी भारताचा संघ -रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उप कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.राखीव खेळाडू - शुबमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलील अहमद.