Join us  

गंभीर टीम इंडियात जास्त काळ टिकणार नाही; भारताच्या वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूचा धक्कादायक दावा

टीम इंडिया आजपासून श्रीलंकेच्या धरतीवर ट्वेंटी-२० मालिका खेळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 4:24 PM

Open in App

gautam gambhir head coach : भारतीय संघ शनिवारपासून अर्थात आजपासून श्रीलंकेच्या धरतीवर ट्वेंटी-२० मालिका खेळत आहे. टीम इंडियाचा नवनिर्वाचित प्रशिक्षक गौतम गंभीरची ही पहिलीच परीक्षा आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वातील टीम इंडिया श्रीलंकेविरूद्ध तीन सामन्यांची मालिका खेळेल. ही मालिका नाना कारणांनी महत्त्वाची आहे. गंभीर एका नव्या भूमिकेत असल्यानेही या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. आजी माजी खेळाडू गंभीरबद्दल आपापली मतं मांडत आहेत. अशातच भारताच्या विश्वविजेत्या संघाचा भाग राहिलेल्या जोगिंदर शर्माने एक मोठा दावा केला. 

जोगिंदर शर्माने म्हटले की, गौतम गंभीर संघाला नक्कीच सांभाळू शकतो. पण, मला वाटते की तो टीम इंडियात फार काळ टिकणार नाही. कारण की त्याचे स्वत:चेच काही निर्णय असतात. त्यामुळे एखाद्या खेळाडूसोबत त्याचा वाद होऊ शकतो. गंभीरने घेतलेले निर्णय अनेकदा अनेकांना खटकतात. तो श्रेय घेणाऱ्यांपैकी नाही, तो त्याचे मनापासून काम करत असतो यात शंका नाही. 

दरम्यान, जोगिंदर शर्मा भारताच्या २००७ च्या विश्वविजेत्या संघाचा भाग राहिला आहे. शनिवारपासून श्रीलंका आणि भारत यांच्यातील ट्वेंटी-२० मालिकेला सुरुवात होत आहे. भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर ट्वेंटी-२० आणि वन डे मालिका खेळेल. ट्वेंटी-२० विश्वचषकानंतर भारताची युवा ब्रिगेड झिम्बाब्वे दौऱ्यावर गेली होती. या मालिकेतून भारताच्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. पण, आता विराट, रोहित, हार्दिकसह सूर्यकुमार यांचे पुनरागमन झाले आहे. नवनिर्वाचित प्रशिक्षक गौतम गंभीरची ही पहिलीच परीक्षा असणार आहे.

२००७ आणि २०११ च्या टीम इंडियाच्या विश्वविजेतेपदांमध्ये गंभीरने मोलाची भूमिका बजावली होती. दोनही फायनलमध्ये गंभीरने सर्वाधिक धावा केल्या होत्या. आता गौतम गंभीर टीम इंडियाच्या खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहे. ट्वेंटी-२० विश्वचषकानंतर राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्याने त्याआधीच बीसीसीआयकडून नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू झाला होता. त्यात गौतम गंभीरचे नाव आघाडीवर होते. तसेच, भाजपाकडून २०१९ ते २०२४ या काळात खासदार असलेला गंभीर, यावेळची लोकसभा निवडणुक लढला नव्हता. कोलकाता संघाला मेंटॉर म्हणून IPL 2024 जिंकवून देण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली होती. त्यानंतर आज अखेर त्याच्या नावाच अधिकृत घोषणा झाली.

भारताचा ट्वेंटी-२० संघ -सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.  

ट्वेंटी-२० मालिकेचे वेळापत्रक -पहिला सामना - २७ जुलै - संध्याकाळी ७ वा.दुसरा सामना - २८ जुलै - संध्याकाळी ७ वा.तिसरा सामना - ३० जुलै - संध्याकाळी ७ वा.

टॅग्स :गौतम गंभीरभारतीय क्रिकेट संघ