Join us  

'ब्लड कॅन्सर'शी झुंज देणाऱ्या गायकवाड यांच्यासाठी कपिल देव सरसावले; पेन्शन दान करण्यास तयार

anshuman gaekwad cancer : भारताचे माजी खेळाडू अंशुमन गायकवाड ब्लड कॅन्सरने ग्रस्त आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 2:35 PM

Open in App

Anshuman Gaekwad Blood Cancer भारतीय क्रिकेट संघाला पहिला विश्वचषक जिंकून देणारे कर्णधार म्हणजे कपिल देव. १९८३ मध्ये त्यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने विश्वचषक जिंकण्याची किमया साधली. कपिल देव हे त्यांच्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतात. आता त्यांनी आपला सहकारी खेळाडू अंशुमन गायकवाड यांच्यासाठी आवाज उठवला आहे. ब्लड कॅन्सरशी झुंज देणाऱ्या गायकवाड यांना बीसीसीआयने आर्थिक मदत करावी अशी मागणी त्यांनी केली. ७१ वर्षीय अंशुमन गायकवाड यांच्यावर मागील एक वर्षापासून लंडनच्या किंग्ज कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. बीसीसीआयला मदतीची विनंती करण्यासोबतच भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी एक मोठे विधान केले. गायकवाड यांच्या उपचारासाठी मी माझी पेन्शन देण्यासही तयार असल्याचे त्यांनी सांगितले. 

मोठ्या कालावधीपासून आजाराशी सामना करत असलेल्या गायकवाड यांच्यासाठी बीसीसीआयने पुढे यायला हवे असे देव यांनी सांगितले. कपिल देव 'स्पोर्ट्सस्टार'शी बोलत होते. ते म्हणाले की, हे अतिशय दुःखद आणि निराशाजनक आहे. मला वेदना होत आहेत कारण मी अंशुसोबत खेळलो आहे आणि मी त्याला या अवस्थेत पाहू शकत नाही. कोणालाही त्रास होऊ नये असे मला वाटते. मला माहित आहे की बोर्ड (BCCI) त्याची काळजी घेईल. आम्ही कोणावरही जबरदस्ती करत नाही. अंशुसाठी कोणतीही मदत करायची असेल तर हा त्यांचा निर्णय आहे. काही धोकादायक गोलंदाजांसमोर उभे असताना, त्यांचा सामना करताना अंशुमानच्या चेहऱ्यावर आणि छातीवर जखमा झाल्या. आता त्याच्यासाठी उभे राहण्याची वेळ आली आहे. मला खात्री आहे की क्रिकेट चाहते त्याला निराश करणार नाहीत. चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करावी.

पेन्शन दान करण्यास तयारतसेच दुर्दैवाने आपल्याकडे तगडी यंत्रणा नाही. आजच्या घडीला क्रिकेटपटू चांगले पैसे कमवत आहेत. हे देखील चांगले आहे की सपोर्ट स्टाफ सदस्यांना देखील चांगले वेतन मिळते. आमच्या काळात बीसीसीआयकडे पैसे नव्हते. त्यामुळे आज त्यांनी भूतकाळातील खेळाडूंची काळजी घेणे आवश्यक आहे. पण खेळाडूंचे योगदान कुठे पाठवले जाते? ट्रस्ट तयार झाला तर त्यात पैसे ठेवता येतात. पण आमच्याकडे यंत्रणा नाही. विश्वास असला पाहिजे. मला वाटते बीसीसीआय हे करू शकते. ट्रस्टच्या माध्यमातून आजी माजी खेळाडूंची काळजी घेतली जाते. जर माझ्या कुटुंबाने मला परवानगी दिली तर मी माझी पेन्शन दान करून मदत करण्यास तयार आहे, असेही कपिल देव यांनी नमूद केले. 

टॅग्स :कपिल देवभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय