Rohit Sharma : गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक बनला आहे. त्याच्या नेतृत्वात टीम इंडिया पहिलीच मालिका खेळत आहे. तीन ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ श्रीलंकेत दाखल झाला आहे. २७ तारखेपासून या मालिकेला सुरुवात होईल. रोहित शर्माने ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीयमधून निवृत्ती घेतल्याने सूर्याला कर्णधार बनवण्यात आले आहे. तर रोहित वन डे संघाचा कर्णधार कायम आहे. त्यामुळे रोहित २०२७ मध्ये होणारा वन डे विश्वचषक खेळू शकतो असा तर्क लावला जात आहे. अलीकडेच प्रशिक्षक गौतम गंभीरने याला दुजारा दिला होता. मात्र याचा दाखला देत भारताचे माजी खेळाडू चांगलेच संतापल्याचे दिसले.
भारताचे माजी खेळाडू कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवर बोलताना विविध बाबींवर प्रकाश टाकला. श्रीकांत यांनी मुलगा अनिरूद्धशी बोलताना रोहितवर बोचरी टीका केली. विराट कोहली एक चॅम्पियन खेळाडू आहे. रोहितने २०२७ च्या विश्वचषकात खेळू नये असे मला वाटते. तो दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर बेशुद्धच होईल, असे श्रीकांत म्हणाले. श्रीकांत यांचे हे विधान सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. या आधी देखील त्यांनी रोहित शर्मावर टीका केली होती. रोहित धावांसाठी संघर्ष करत असताना त्यांनी वेळोवेळी तोंडसुख घेतले.
दरम्यान, अलीकडेच भारतीय संघाचे माजी निवडकर्ते कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी ऋतुराज गायकवाडची बाजू मांडताना बीसीसीआयवर टीका केली. ते म्हणाले की, शुबमन गिल ट्वेंटी-२० क्रिकेटसाठी पात्र नाही. त्याला उपकर्णधार का बनवण्यात आले हे मला समजत नाही. ऋतुराज गायकवाडची ट्वेंटी-२० मध्ये आपोआप जागा बनते. तो ट्वेंटी-२० साठी पात्र आहेच पण गिलसारखे त्याचे नशीब नसल्याने डावलले जाते. हे खूप चुकीचे आहे. मला वाटते की, ऋतुराज आगामी काळात धावा करून निवडकर्त्यांना प्रत्युत्तर देईल.