Laxman Sivaramakrishnan | नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाला अलीकडच्या काळात फिरकीचा सामना करण्यात अडचणी येत आहेत. टीम इंडियाच्या फलंदाजांनी फिरकी गोलंदाजांसमोर गुडघे टेकले आहेत, मग तो फॉरमॅट कोणताही असो. अलीकडेच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत नॅथन लायन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुहनमन या त्रिकुटाने टीम इंडियाच्या फलंदाजीची कंबर मोडली होती. याशिवाय वन डे मालिकेतील शेवटच्या सामन्यात ॲश्टन अगर आणि ॲडम झाम्पा यांनी भारतीय फलंदाजांची डोकेदुखी वाढवली. तसेच भारतीय फिरकीपटू मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये प्रभावी राहू शकलेले नाहीत.
दरम्यान, भारताचे माजी फिरकीपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी दावा केला आहे की, त्यांना भारतीय संघाची याबाबत मदत करायची होती पण संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी नकार दिला. शिवरामकृष्णन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा दावा केला आहे. कुलदीप यादवच्या गोलंदाजीदरम्यान एका चाहत्याने शिवरामकृष्णन यांना मैदानासंबंधी प्रश्न विचारला होता. चाहत्याने सांगितले की, "ॲडम झाम्पाच्या गोलंदाजीदरम्यान ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने चांगले क्षेत्ररक्षण केले होते. कुलदीपच्या गोलंदाजीदरम्यान क्षेत्ररक्षण नीट झाले नाही. यावर तुमचे काय मत आहे?."
शिवरामकृष्णन यांचा मोठा दावा
चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना शिवरामकृष्णन यांनी म्हटले की, त्यांनी राहुल द्रविड यांच्याशी याबाबत चर्चा केली होती. याशिवाय टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, द्रविड यांनी नकार दिला. "जेव्हा मी राहुल द्रविडला सेवेसाठी माझी ऑफर सांगितली, तेव्हा तो म्हणाला की, फिरकीपटूंसोबत त्याच्या हाताखाली काम करण्यासाठी मी खूप सीनिअर आहे", असे शिवरामकृष्णन यांनी म्हटले. शिवरामकृष्णन हे त्यांच्या काळातील नामांकित फिरकीपटू आहेत. 1985 मध्ये चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाचे ते सदस्य आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Former player Laxman Sivaramakrishnan says he wanted to help Indian team with spin problem but Rahul Dravid refused
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.