भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगला असून दहा संघ एका ट्रॉफीसाठी रिंगणात आहेत. कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान शनिवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमनेसामने असणार आहेत. दोन्हीही संघांनी आपल्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. पाकिस्तानी संघाने सलामीच्या सामन्यात नेदरलॅंड्स आणि दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला. शेजाऱ्यांना दोन्ही सामने जिंकण्यात यश आले असले तरी बाबर आझमच्या संघाच्या क्षेत्ररक्षणाने त्यांची फजिती केली. हास्यास्पद क्षेत्ररक्षण पाहून पाकिस्तानी खेळाडूंना ट्रोल करण्यात आले. यावरून संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने देखील चिमटे काढले आहेत.
पाकिस्तानी संघाच्या क्षेत्ररक्षणाची खिल्ली उडवताना आफ्रिदीने याची तुलना काश्मीरची केली. पाकिस्तानातील एका वृत्तवाहिनीशी बोलताना शाहिद आफ्रिदीने मिश्किलपणे म्हटले, "पाकिस्तानचे क्षेत्ररक्षण आणि काश्मीरचा मुद्दा खूप जुना आहे. पाकिस्तानला क्षेत्ररक्षणात सक्रिय राहावे लागेल."
१४ तारखेला थरार दरम्यान, वन डे विश्वचषकात शनिवारी भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने असणार आहेत. या बहुचर्चित सामन्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना पार पडेल. या मोठ्या सामन्याचे साक्षीदार होण्यासाठी चाहत्यांनी काही महिन्यांपासूनच तिकिटांची खरेदी करण्यास सुरूवात केली होती.
विश्वचषकासाठी पाकिस्तानी संघ - बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उप कर्णधार), फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सलमान आगा, सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, सॅम मीर, हारिस रौफ, मोहम्मद वसीम ज्युनिअर, हसन अली आणि शाहीन आफ्रिदी.
राखीव खेळाडू - मोहम्मद हारिस, जमान खान, अबरार अहमद.