रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाला न्यूझीलंडलविरुद्धच्या मालिकेत दारुण पराभवाचा सामना करावा लागला. पाहुण्या किवी संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारताला तब्बल १२ वर्षांनंतर आपल्या मायदेशात कसोटी मालिकेत पराभव पत्करावा लागला. सलग दोन सामने गमावणाऱ्या टीम इंडियासह कर्णधार रोहित शर्मावर टीका होत आहे. अशातच भारताचा माजी खेळाडू आणि रोहितचा जवळचा सहकारी शिखर धवनने आपल्या जिगरीचे समर्थन करताना रोहितची पाठराखण केली.
केवळ एक मालिका गमावल्यामुळे रोहितच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणे हे चुकीचे आहे. एक खेळाडू म्हणून आम्ही हार किंवा विजयामुळे फार प्रभावित होत नाही. हा एक खेळाचा भाग आहे. रोहित हा एक अप्रतिम कर्णधार आहे यात शंका नाही. संघातील खेळाडू त्याचा खूप सन्मान करतात, असे शिखर धवनने सांगितले. तसेच आगामी काळात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टीम इंडिया प्रभावी कामगिरी करेल असा मला विश्वास आहे. जर रोहित पहिल्या सामन्यात नसेल तर नक्कीच त्याची कमी भासेल. पण, इतरही खेळाडूंमध्ये मोठ्या व्यासपीठावर साजेशी कामगिरी करण्याची क्षमता आहे, असेही धवनने नमूद केले. तो इंडिया टुडेशी बोलत होता.
दरम्यान, शनिवारी न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाने ऐतिहासिक कामगिरी करताना बलाढ्य भारताला प्रथमच त्यांच्या घरात हरवले. पुणे कसोटीत भारताचा दारुण पराभव झाला आणि पाहुण्या किवी संघाने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. बंगळुरू आणि पुणे कसोटीतील पराभवासह भारत मोठ्या कालावधीनंतर मालिका जिंकण्यात अपयशी ठरला. मागील तब्बल २९५ महिन्यांमध्ये केवळ तीन संघांना भारतीय भूमीवर कसोटी मालिका जिंकता आली आहे. याआधी ऑस्ट्रेलिया (२००४) आणि इंग्लंडने (२०१२) ही किमया साधली होती. आता या यादीत न्यूझीलंडच्या (२०२४) संघाचा समावेश झाला आहे. न्यूझीलंडच्या संघाने ६९ वर्षांनंतर टीम इंडियाला भारतात कसोटी मालिकेत पराभूत केले. न्यूझीलंडच्या क्रिकेटसाठी हा सोनेरी क्षण असून, दारुण पराभवामुळे भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि त्याच्या सेनेला लक्ष्य केले जात आहे. श्रीलंकेविरुद्धच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर किवी संघाने जोरदार पुनरागमन केले आणि अव्वल स्थानी असलेल्या भारताला पराभवाची धूळ चारली.