पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्यावर पंजाब प्रांतातील वजीराबाद येथे हल्ला झाला असून ते जखमी झाले आहेत. त्याच्या पायाला गोळी लागली आहे. आझादी मार्चदरम्यान इम्रान खान यांच्यावर हा हल्ला झाला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे, तर 5 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाला शोएब अख्तर - इम्रान खान यांच्यावरील हल्ल्यानंतर प्रतिक्रिया देताना शोएब म्हणाला, 'इम्रान भाई यांच्यावर हल्ला झाल्याचे ऐकले. आता ते ठीक आहेत आणि अल्लाह त्यांना सुरक्षित ठेवीन. या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. हा हल्ला ज्याने कुणी केला, असे प्रकार या देशात बंद व्हायला हवेत. आता वाईट गोष्टी ऐकल्या जाऊ शकतील, एवढी मनाची ताकद राहिलेली नाही. अल्लाह आपल्या देशाचे रक्षण करो. संपूर्ण ड्रॉमा बंद व्हायला हवा आणि आपण एखाद्या निष्कर्षावर पोहोचायला हवे.'
बाबर आझमनेही केला निषेध - बाबर आझमने ट्विटच्या माध्यमातून इम्रान खान यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. "इम्रान खान यांच्यावर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध. अल्लाह कप्तानला सुरक्षित ठेवो आणि आमच्या प्रिय पाकिस्तानचे रक्षण करो."
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीने हल्ल्याची कबुली दिली आहे. त्याला हल्ला करताना पकडण्यात आले होते. तसेच मारेकऱ्याने इम्रान खान यांच्यावर जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. खरे तर सर्वप्रथम हल्ला करणाऱ्याचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले होते, मात्र आता त्याची प्रकृती ठीक आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका व्यक्तीला अटक केली असून इम्रान खान यांना नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार इम्रान खान यांनी सध्या पाकिस्तानात 'आझादी मोर्चा' काढला आहे. सरकार विरोधी लढ्यात ते रस्त्यावर उतरले आहेत आणि निदर्शने करत आहेत.