माजी रणजीपटू शेखर गवळी यांचा मृत्यू; ट्रेकिंगदरम्यान कोसळले होते दरीत

शेखर गवळी ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी खोल दरी असल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी अग्निशामक दल व आपत्ती व्यवस्थापन टीमला पाचारण करण्यात आले होते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 02:05 PM2020-09-02T14:05:15+5:302020-09-02T14:08:19+5:30

whatsapp join usJoin us
Former Ranji Trophy player Shekhar Gawli dies; The valley had collapsed during trekking | माजी रणजीपटू शेखर गवळी यांचा मृत्यू; ट्रेकिंगदरम्यान कोसळले होते दरीत

माजी रणजीपटू शेखर गवळी यांचा मृत्यू; ट्रेकिंगदरम्यान कोसळले होते दरीत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

महाराष्ट्र रणजी क्रिकेट संघाचे प्रशिक्षक शेखर गवळी यांचा सेल्फी काढतांना पाय घसरून खोल दरीत पडल्याची घटना मंगळवार दिनांक १ रोजी सायंकाळच्या सुमारास इगतपुरी परीसरात घडली होती. शेखर गवळी हे माजी रणजीपटूदेखील आहेत. शेखर गवळी हे आपल्या तीन मित्रांसमवेत इगतपुरीच्या हॉटेल गणाका मागे ट्रेकिंगसाठी आले होते. ट्रेकिंग सुरू असताना सेल्फी घेण्याच्या नादात त्यांचा तोल गेल्याने ते २५० फुट खोल दरीत पडल्याचं प्रशासनाने सांगितले आहे.

शेखर गवळी ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी खोल दरी असल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी अग्निशामक दल व आपत्ती व्यवस्थापन टीमला पाचारण करण्यात आले होते. मात्र आंधार पडल्याने त्यातच पावसाची संततधार सुरू असल्याने मदतकार्यात अडथळे निर्माण झाल्याने रात्री शोधकार्य थांबवण्यात आले होते. नाशिकच्याच नव्हे तर महाराष्ट्रातील क्रीडाविश्वाला चटका लावणारी घटना मंगळवारी सायंकाळी घडली. इगतपुरीतील  हॉटेल गणाकाच्या पाठीमागच्या परिसरातील डोंगररांगेत ट्रेकिंगसाठी गेलेल्या ग्रुपमधील महाराष्ट्राच्या २३ वर्षाखालील क्रिकेट संघाचे फिटनेस ट्रेनर आणि माजी रणजीपटू शेखर गवळी हे खोल दरीत कोसळले होते.

त्यांना शोधण्याचे कार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होते. मात्र, अंधार आणि खोलदरी तसेच, २५० ते ३०० फूट डोहामुळे शोधकार्यात अनेक अडचणी आल्या आणि अखेर शोध थांबवावा लागला. बुधवारी ( दि. २ ) पहाटे ५ वाजेपासून तहसीलदार परमेश्वर कासुळे, पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली शहापुर, कसारा व नाशिक येथील आपत्ती व्यवस्थापन टीमचे शाम धुमाळ, मनोज मोरे, अक्षय राठोड, विनोद आयरे, मयुर गुप्ता, लक्ष्मण वाघ, दत्ता बाताडे, मानस लोहकरे, दयानंद कोळी, विकास लाटे, मिलींद लोहकरे, किरण धाईजे, यांनी पुन्हा शोधकार्य सुरू केले. सकाळी दहा वाजेच्या सुमारासपुन्हा शोधकार्य सुरू केले. 

सकाळी दहा वाजेच्या सुमारास रेल्वे पुलाखालील एका पाण्याच्या डोहाच्या कडेला अडकलेल्या स्थितीत गवळी यांचा मृतदेह मिळुन आला. त्यांचा मृतदेह ऊत्तर तपासणीसाठी इगतपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. यावेळी तहसीलदार परमेश्वर कासुळे, पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, पोलीस हवालदार वैभव वाणी, शिवाजी लोहरे, नगरपरिषद अग्निशामक दलाचे यशवंत ताठे, नागेश जाधव आदी उपस्थित होते. 

महाराष्ट्राच्या २३ वर्षाखालील क्रिकेट संघाचे फिटनेस ट्रेनर आणि प्रसिद्ध योगा प्रशिक्षक म्हणून त्यांची राज्यभरात ख्याती आहे. त्यामुळे या घटनेमुळे राज्यभरातील क्रिकेटप्रेमींच्या भुवया उंचावल्या आहेत. शेखर गवळी हे १९९७ ते २००४ पर्यंत महाराष्ट्र संघाकडून रणजी क्रिकेट खेळलेले आहे. रणजी क्रिकेटचा अनुभव बघता त्यांची महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. ट्रेकिंगचे शौकीन असलेले शेखर गवळी नेहमी मित्रांसमवेत सायकलवरून ट्रेकिंगला जात असल्याचं त्यांनी सोशल मीडियाला यापूर्वी टाकलेल्या फोटोवरून स्पष्ट झालं आहे. या दुखद घटनेमुळे क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Former Ranji Trophy player Shekhar Gawli dies; The valley had collapsed during trekking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.