मुंबई - पोर्तुगाल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो नव्या क्लबकडून पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या आठवड्यात तो युव्हेंटसकडून आपला पहिला सामना खेळण्यासाठी कसून सराव करत आहे. युव्हेंटसने त्याला जवळपास 800 कोटी रक्कम देऊन आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. ख्रिस्तियानो रोनाल्डो नव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आनंदात असताना रेयाल माद्रिदचा माजी खेळाडू रोनाल्डो निमोनिया झाल्यामुळे रुग्णालयात दाखल झाला आहे.
ब्राझिलचा दिग्गज फुटबॉलपटू रोनाल्डो सध्या इबिझा येथील रुग्णालयात उपचार घेत आहे. तेथील स्थानिक मीडियाच्या माहितीनुसार रोनाल्डोच्या छातीत अचानक वेदना होऊ लागल्या आणि त्याल कॅन मिसेस हॉस्पिटलमध्ये त्वरित दाखल करण्यात आले. मात्र, त्याला दुस-या रुग्णालयात हलवण्याची विनंती कॅन मिसेसच्या डॉक्टरांनी केली. सध्या तो न्युएस्ट्रा सेनोरा डेल रोसारीओ हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.
दोन्ही रुग्णालयातील डॉक्टरांनी रोनाल्डोच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिलेला आहे. 41 वर्षीय रोनाल्डोची इबिझा येथे मालकीची जागा आहे आणि तो तेथे सुट्टीसाठी येत असतो. 2012 मध्ये रोनाल्डोला डेंग्यू झाला होता, तर थायरॉईडमुळे त्याचे बरेच वजन कमीही झाले होते.
Web Title: Former Real Madrid player Ronaldo is in Hospital
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.