Join us  

"खराब कामगिरीनंतरही सूर्या वन डे वर्ल्डकप खेळणार", माजी सिलेक्टरच्या दाव्याने चर्चेचा उधाण

Suryakumar yadav : सूर्यकुमार यादवला आगामी वन डे विश्वचषकात खेळवायला हवे, असे माजी निवडकर्त्याने म्हटले आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 1:42 PM

Open in App

Sarandeep Singh, ODI world cup 2023 । नवी दिल्ली : अलीकडेच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या वन डे मालिकेत भारताचा 1-2 असा पराभव झाला. मालिकेतील पहिला सामना जिंकून यजमान संघाने आघाडी घेतली होती, मात्र शेवटचे दोन सामने जिंकून ऑस्ट्रेलियाच्या संघाने मालिका खिशात घातली. या मालिकेतील तिन्ही सामन्यात भारताचा सूर्यकुमार यादव गोल्डन डकचा बळी ठरला. तिन्ही सामन्यात पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यामुळे सूर्याच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. त्यामुळे आगामी वन डे विश्वचषकात सूर्याला संधी मिळणार नसल्याचे बोलले जात असतानाच संघाचे माजी निवडकर्ते सरनदीप सिंग यांनी एक मोठे विधान केले आहे. 

माजी निवडकर्ते सरनदीप सिंग यांच्या म्हणण्यानुसार, सूर्याने आता खराब प्रदर्शन केले असले तरी त्याला वन डे विश्वचषकाच्या संघात स्थान मिळेल. खरं तर सूर्याला ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या तिन्ही सामन्यांमध्ये फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. पण मिळालेल्या संधीचा फायदा घेण्यात तो अयशस्वी ठरला. पहिल्या दोन सामन्यात त्याला मिचेल स्टार्कने बाद केले तर अखेरच्या सामन्यात श्टन अगरने सूर्याला बाहेरचा रस्ता दाखवला.

सरनदीप सिंग यांनी केले समर्थन दरम्यान, सूर्यकुमार यादवला आता माजी निवडकर्ते सरनदीप सिंग यांचे समर्थन मिळाले आहे. न्यूज 18 शी बोलताना सरनदीप सिंग यांनी म्हटले, "सूर्यकुमार यादवमध्ये गोष्टींना बदलण्याची क्षमता आहे. तो एक प्रभावी क्रिकेटपटू आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध तिन्ही सामन्यांमध्ये पहिल्याच चेंडूवर बाद झाला याचे मला वाईट वाटते. पण यातून बाहेर पडण्याची त्याच्यात निश्चितच क्षमता आहे."

सूर्याला विश्वचषकात संधी द्यायला हवी - सरनदीप सिंग  "तसेच हा 32 वर्षीय फलंदाज विश्वचषकाच्या संघात असेल याची मला खात्री आहे. आपण सर्वांनी याचे समर्थन केले पाहिजे. मी जेव्हा निवडकर्ता होतो तेव्हा आमच्याकडे एक योजना आणि एक टीम तयार असायची, जी अखेरपर्यंत खेळाडूंचे समर्थन करायची. याशिवाय सूर्या मागील एक वर्षापासून शानदार लयमध्ये आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप धावा केल्या आहेत आणि म्हणूनच त्याला संघात स्थान मिळाले आहे. त्यामुळे मला जर कोणी विचारले तर नक्कीच मी सांगेन की त्याला विश्वचषकात संधी द्यायला हवी", असे सरनदीप सिंग यांनी आणखी सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :आयसीसी आंतरखंडीय चषकसूर्यकुमार अशोक यादवभारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाबीसीसीआय
Open in App