नवी दिल्ली: अलीकडेच भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. तिथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ट्वेंटी-२०, वन डे आणि कसोटी मालिका खेळवली गेली. भारताला एकाही मालिकेत पराभव पत्कारावा लागला नाही. पण, वन डे मालिका वगळता दोन्हीही मालिका अनिर्णित राहिल्या. वन डे विश्वचषकात खेळलेल्या काही वरिष्ठ खेळाडूंना वन डे आणि ट्वेंटी-२० मालिकेतून विश्रांती दिली गेली. या मालिकेतून युझवेंद्र चहलने देखील संघात पुनरागमन केले होते.
चहलला केवळ वन डे मालिकेत स्थान मिळाले होते. मात्र, ट्वेंटी-२० संघातून वगळण्यात आले. त्यामुळे माजी भारतीय क्रिकेटपटूंनी देखील प्रश्न उपस्थितीत केले होते. अशातच आता दक्षिण आफ्रिकेचा माजी फिरकीपटू इमरान ताहिरने कुलदीप यादव आणि चहल यांच्यात स्पर्धा असल्याचे म्हटले आहे.
चहल चांगला गोलंदाज पण... वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना ताहिरने म्हटले, "युझवेंद्र चहल चांगली गोलंदाजी करत नाही म्हणून त्याला वगळलं जातं असं मला अजिबात वाटत नाही. माझ्यासाठी तो चांगली गोलंदाजी करत आहे. चहल उत्कृष्ट गोलंदाजी करण्यात माहिर आहे. त्याची स्पर्धा अनेकदा कुलदीप यादवशी होते. कुलदीप एक पाऊल पुढं असल्यानं चहलला मागील काळात संघातून वगळण्यात आलं. कुलदीपनं अप्रतिम कामगिरी केली आहे."
तसेच रवींद्र जडेजामुळं भारताला योग्य संतुलन सापडलं. चहलनं नव्यानं सुरुवात केली पाहिजे कारण कुलदीपनं दोन्ही बाजूंनी संधी साधली. त्यामुळं चहलला आता थोडी वाट पाहावी लागेल. तो एक अद्भुत गोलंदाज आहे आणि नक्कीच पुनरागमन करेल, असं ताहिरनं चहलबद्दल सांगितलं.