भारतीय संघ मायदेशात १९ सप्टेंबरपासून बांगलादेशविरूद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. अलीकडेच टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर गेली होती, जिथे रोहित शर्माच्या नेतृत्वातील वन डे संघाला पराभव पत्करावा लागला. आता नव्या उमेदीने टीम इंडिया बांगलादेशविरूद्ध मैदानात असेल. त्याआधी भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून मॉर्नी मॉर्केलची वर्णी लागली आहे. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचा जवळचा सहकारी म्हणून मॉर्केलची ओळख आहे.
बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेतून मोहम्मद शमीची संघात एन्ट्री होईल, असे मुख्य निवडकर्ता अजित आगरकरने सांगितले होते. त्यामुळे गंभीरची टीम अर्थात फलंदाजी आणि गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज मॉर्नी मॉर्केल गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कोचिंग स्टाफमध्ये असेल. त्याचा संघातील सहभाग सप्टेंबरमध्ये सुरू होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या घरच्या मालिकेपासून सुरू होईल. मॉर्केल आयपीएलमध्ये केकेआरकडूनही खेळला आहे.
दरम्यान, मॉर्नी मॉर्केलची वरिष्ठ भारतीय पुरुष संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचा करार १ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या वृत्ताला बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दुजोरा दिला असल्याचेही क्रिकबझने स्पष्ट केले.
बांगलादेशचा भारत दौरा१९-२४ सप्टेंबर - पहिला कसोटी सामना, चेन्नई२७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर - दुसरा कसोटी सामना, कानपूर६ ऑक्टोबर - पहिला ट्वेंटी-२० सामना, ग्वाल्हेर९ ऑक्टोबर - दुसरा ट्वेंटी-२० सामना, दिल्ली १२ ऑक्टोबर - तिसरा ट्वेंटी-२० सामना, हैदराबाद