Join us  

मॉर्नी मॉर्केलचा पाकिस्तानच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदाचा राजीनामा; वर्ल्ड कपमधील धुलाईनंतर निर्णय

वन डे विश्वचषक २०२३ पाकिस्तानी संघासाठी एका वाईट स्वप्नाप्रमाणे राहिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 5:08 PM

Open in App

नवी दिल्ली : वन डे विश्वचषक २०२३ पाकिस्तानी संघासाठी एका वाईट स्वप्नाप्रमाणे राहिला. शेजाऱ्यांना अफगाणिस्तानसारख्या नवख्या संघाकडून देखील पराभवाचा सामना करावा लागला. सुरूवातीला दोन सामने जिंकल्यानंतर पाकिस्तानची विजयाची गाडी रूळावरून घसरली अन् सलग चार सामन्यांमध्ये बाबर आझमच्या संघाला पराभव पत्करावा लागला. जगातील घातक गोलंदाजी अटॅक म्हणून प्रसिद्धी मिळवणाऱ्या पाकिस्तानी गोलंदाजांची मात्र चांगलीच धुलाई झाली. शाहीन आफ्रिदी आणि हारिस रौफ या प्रमुख गोलंदाजांना संपूर्ण स्पर्धेदरम्यान पॉवरप्लेत केवळ तीन बळी घेता आले. आपल्या गोलंदाजांची खराब कामगिरी पाहून पाकिस्तान क्रिकेट बोर्डात वाद सुरू झाला. अशातच संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केलने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

नसीम शाहच्या अनुपस्थितीत हसन अलीला पाकिस्तानी संघात स्थान मिळाले होते. पण, त्यालाही काही प्रभावी कामगिरी करता आली नाही. काही सामन्यांमध्ये शाहीनने चमक दाखवली पण त्याच्या कामगिरीचा संघाला काहीच फायदा झाला नाही. मॉर्केल प्रशिक्षक म्हणून जून महिन्यापासून पाकिस्तानी संघासोबत जोडला गेला होता. सोमवारी त्याने आपण राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. पाकिस्तानला विश्वचषकातील नऊपैकी केवळ चार सामने जिंकता आल्याने मॉर्नी मॉर्केलने हा निर्णय घेतला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अद्याप मॉर्केलची रिप्लेसमेंट जाहीर केली नाही. आगामी काळात बाबर आझमचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असून तिथे तीन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. 

खरं तर अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा पराभव पाकिस्तानला महागात पडला. नेदरलॅंड्स आणि श्रीलंकेला नमवून शेजाऱ्यांनी चांगली सुरूवात केली होती. पण, भारताने दारूण पराभूत केल्यानंतर पाकिस्तानला सलग तीन सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेने शेजाऱ्यांना पराभवाची धूळ चारली अन् पाकिस्तानचा उपांत्य फेरीचा मार्ग खडतर झाला. त्यानंतर बांगलादेशला नमवून त्यांनी पुनरागमन केले पण नेटरनरेटमुळे पाकिस्तानला फटका बसला. अखेरच्या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडने बाबर अॅंड कंपनीला पराभूत करून बाहेरचा रस्ता दाखवला.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपपाकिस्तानबाबर आजम